रणरागिणींच्या हाती ‘सातारी एसटी’--लोकमत विशेष
By Admin | Updated: February 20, 2015 23:31 IST2015-02-20T21:08:45+5:302015-02-20T23:31:32+5:30
महिलांसाठी ११६ जागा राखीव : सातारा विभागासाठी होणार लवकर ३८७ चालकांची भरती

रणरागिणींच्या हाती ‘सातारी एसटी’--लोकमत विशेष
जगदीश कोष्टी -सातारा -एसटीत खाकी गणवेश घालून वाहकांना पाहिल्यानंतर पाच वर्षांपूर्वी कौतुक वाटत होते. मात्र, यंदा महिलांसाठीही शासन निर्णयसाठी तीस टक्के समांतर आरक्षण ठेवले आहे. त्यामुळे भरती होणार असलेल्या ३८७ पैकी महिलांसाठी ११६ जागा राखीव ठेवल्या आहेत. त्यामुळे लवकरच स्टिअरिंगवर महिला दिसायला लागणार आहेत. आरक्षित जागांवर महिला उमेदवार न मिळाल्यास इतर उमेदवारांमधून भरती केली जाणार आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या ३१ विभागांतून चालक भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सुमारे ७ हजार ६३१ जागांसाठी १६ फेबु्रवारीपासून आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. सातारा विभागात ३८७ चालकांची भरती होणार आहे. चालकपदासाठी बॅच बिल्ला काढण्यासाठी आठवी पास असणे बंधनकारक आहेत. त्यामुळे अनेक चालक केवळ बिल्ला मिळविण्यासाठी आठवीची परीक्षा देत होते. खासगी वाहनांवर कार्यरत असलेले अनेक चालक आठवी पास आहेत. त्यांच्याकडे बॅच बिल्ला आहे. या आधारे एसटीत भरती होऊन शासकीय नोकरी मिळविण्याचे अनेकांनी स्वप्न पाहिले आहे. मात्र, महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत किमान शैक्षणिक पात्रता दहावी पास केली आहे. त्यामुळे त्यांची निराशा झाली आहे. सेवक भरतीसाठी सातवी पास अट असली तरी बेरोजगारांची संख्या मोठी असल्याने बी.एस्सी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करत आहेत. त्यामुळे साहजिकच लेखी परीक्षेत गुण मिळवून त्यांची वर्णी लागत आहे. कोणत्याही पदावर नोकरी मिळवायची आणि स्पर्धा परीक्षा देत राहणे, हा फॉर्म्युला अनेकजण वापरत असल्याने शिपाईपदीही उच्चशिक्षित नोकरदार मिळत आहेत.
एसटीच्या ताफ्यात शिवनेरी, व्हॉल्वो गाड्या सामील होत आहेत. या गाड्या संगणकीकृत आहेत. त्यामुळे अत्याधुनिक यंत्रणा हाताळण्याचा, इंग्रजी भाषेचे किमान ज्ञान उमेदवारांना असणे अपेक्षित आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळांनी शैक्षणिक पात्रता दहावी पास दिली असावी.
- धनाजी थोरात, विभाग नियंत्रक, सातारा.
सातारा विभागीय वाहतूक अधिकारी पदी यापूर्वी कार्यरत असलेल्या यामिनी जोशी या सफाईदारपणे एस.टी चालवत होत्या. विभागात केले जात असलेल्या चालक भरतीवेळी उमेदवारींची वाहन चालविण्याची चाचणी त्या घेत होत्या. यामिनी जोशी या सध्या नाशिक विभागात विभागनियंत्रक पदी कार्यरत आहेत. त्यामुळे एस. टी. महिला चालक बनण्यास सुरक्षीततेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी महिलांनी या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे.