रामराजेंचा पुतळा जाळला !
By Admin | Updated: April 1, 2015 00:07 IST2015-03-31T22:28:49+5:302015-04-01T00:07:06+5:30
साताऱ्यात अकराजण ताब्यात : उदयनराजेंच्या संतप्त समर्थकांची घोषणाबाजी

रामराजेंचा पुतळा जाळला !
सातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील शाब्दिक संघर्ष आता थेट रस्त्यावर पोहोचला आहे. रामराजेंनी उदयनराजेंविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा निषेध म्हणून उदयनराजे यांच्या संतप्त समर्थकांनी मंगळवारी रामराजेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे साताऱ्यात दहन केले. याप्रकरणी अकराजणांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.नीरा-देवघरच्या पाण्याचा प्रश्न घेऊन खासदार उदयनराजे यांनी फलटणमध्ये घेतलेल्या सभेनंतर या दोन नेत्यांमधील संघर्ष पेटण्यास सुरुवात झाली होती. दोघांनीही एकमेकांविरुद्ध भडक विधाने केली होती. ‘उदयनराजेंना लोक डाव्या-उजव्या हाताने मुजरा करत असतील; पण मी मात्र पायानेच मुजरा करेन,’ असे वक्तव्य रामराजेंनी केले होते. त्यामुळे उदयनराजे समर्थक कमालीचे संतप्त झाले. सातारच्या पोवई नाक्यावर दुपारी तीन वाजल्यापासून कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून आधीपासूनच मोठा बंदोबस्त तैनात केला होता. साडेतीन वाजता कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. प्रतीकात्मक पुतळा जाळण्याच्या कार्यकर्त्यांच्या योजनेची पोलिसांना कुणकूण होती. त्यामुळे अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते.काही कार्यकर्त्यांनी पोलिसांची नजर चुकवून प्रतीकात्मक पुतळा पेटविला, तेव्हा मोठी धावपळ उडाली. पोलिसांनी पुतळा पेटविणाऱ्यांच्या दिशेने धाव घेतली. घोषणाबाजी करणारे कार्यकर्तेही त्या दिशेने धावले. पोलिसांनी तातडीने कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. यावेळी अकराजणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सुमारे साडेसहा वाजता त्यांची जामिनावर सुटका झाली. (प्रतिनिधी) (संबंधित वृत्त ३)
गनिमी कावा अन् अपशब्द
आंदोलकांनी घोषणाबाजी करत सिग्नलच्या दिशेने येण्यास सुरुवात केली, तेव्हा पोलिसांचे लक्ष त्यांच्याकडे केंद्रित झाले. तेवढ्यात एका गटाने अजिंक्य कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ रामराजेंचा प्रतीकात्मक पुतळा पेटविला. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. रामराजेंना ‘सरदारांनी छत्रपतींबद्दल तोंड सांभाळून बोलावे,’ असा इशारा आंदोलक वारंवार देत होते. पोलिसांनी पकडल्यावर व्हॅनमध्ये बसूनही आंदोलकांनी अपशब्दांचा मुक्त वापर केला.