नाशिकच्या रमेश रासकरांचा अमेरिकेमध्ये 5 लाख डॉलर्सच्या पुरस्काराने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2016 16:54 IST2016-09-14T16:54:29+5:302016-09-14T16:54:29+5:30
मूळचे नाशिकचे असलेले शास्त्रज्ञ रमेश रासकर यांना अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेचा असा लेमलसन - एमआयटी हा पाच लाख डॉलर्सचा पुरस्कार जाहीर झाला आहे

नाशिकच्या रमेश रासकरांचा अमेरिकेमध्ये 5 लाख डॉलर्सच्या पुरस्काराने गौरव
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 14 - मूळचे नाशिकचे असलेले शास्त्रज्ञ रमेश रासकर यांना अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेचा असा लेमलसन - एमआयटी हा पाच लाख डॉलर्सचा पुरस्कार जाहीर झाला आहे. जगभरातल्या लोकांचं जीवनमान सुधारावं यासाठी रासकर यांनी केलेल्या कार्याची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
मुळचे नाशिकमधले परंतु आता अमेरिकेत स्थायिक झालेले रासकर हे एमआयटी मीडिया लॅबमध्ये कॅमेरा कल्चर रीसर्च ग्रुपचे संस्थापक असून मीडिया आर्ट्स अँड सायन्समध्ये असोसिएट प्रोफेसर आहेत. रासकरांच्या नावावर तब्बल 75 पेटंट असून 120 पेक्षा जास्त संशोधनपर लेख त्यांनी लिहिले आहेत. अल्ट्रा फास्ट इमेजिंग सिस्टिम, अल्प दरातली डोळ्यांची काळजी घेणारी उपकरणे, पुस्तक न उघडता आतला मजकूर वाचू शकणारा कॅमेरा अशी अनेक संशोधने रासकरांच्या नावावर असून विकसनशील देशांना त्यांच्या संशोधन कार्याचा फायदा झाल्याचे लेमलसन - एमआयटीने पुरस्कार घोषित करताना नमूद केले आहे.
जे संशोधक करीअरच्या मधल्या टप्प्यावर असताना तंत्रज्ञानातील शोधांमुळे, विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व गणिताच्या क्षेत्रामध्ये मार्गदर्शक म्हणून परिणामकारक कार्य करतात, अशांना दरवर्षी लेमेलसन - एमआयटी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, बदल घडवणारे आणि सक्षमपणे विविध घटकांची सांगड घालणारे असे बहुश्रूत असल्याचे गौरवोद्गार संस्थेने काढले आहेत. जगभरात सकारात्मक बदल व्हावेत यासाठी ते झटत असल्याचे लेमेलसन - एमआयटी प्रोग्रामचे कार्यकारी संचालक स्टेफनी काउच यांनी म्हटले आहे.
वेगवेगळ्या देशातल्या तरुणांना एकत्र संशोधन कार्य करता यावे यासाठी उपयुक्त यंत्रणा निर्माण करण्यासाठी पुरस्काराच्या रकमेतील काही भाग वापरण्यात येणार असल्याचे रासकर यांनी घोषित केले आहे. प्रत्येकामध्ये समस्या सोडवण्याची क्षमता असते, आणि एकमेकांच्या सहकार्याने अशा अनेक समस्या तरूण सोडवू शकतात, ज्याचा फायदा अब्जावधी लोकांना होऊ शकतो.