रामदास बोडखेंची बेहिशेबी मालमत्ता अडीच कोटींच्या घरात
By Admin | Updated: August 22, 2014 00:40 IST2014-08-22T00:40:41+5:302014-08-22T00:40:41+5:30
माजी राज्यमंत्र्यांच्या बेहिशेबी मालमत्तेचे उत्खनन

रामदास बोडखेंची बेहिशेबी मालमत्ता अडीच कोटींच्या घरात
अकोला - माजी रोजगार हमी योजना राज्यमंत्री रामदास बोडखे यांची बेहिशेबी मालमत्ता ३0 लाखांवरून अडीच कोटी रूपयांच्या घरात पोहोचली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रामदास बोडखे यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल केल्यानंतर, त्यांच्या बेहीशेबी मालमत्तेचे उत्खनन सुरू केले आहे. १९९९ ते २00४ या कालावधीत रामदास बोडखे अकोला जिल्ह्यातील आकोट विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. भारिप-बहुजन महासंघाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि २00२ साली रोजगार हमी योजना राज्यमंत्री पद पदरात पाडून घेतले. या कालावधीत त्यांनी विविध योजनांमध्ये अपहार करून कोट्यवधी रुपयांची संपत्ती गोळा केल्याची तक्रार २00७ साली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बोडखे यांच्यासह त्यांची मुलं आणि भावाविरूद्ध मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी गुन्हे दाखल करून त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा शोध सुरू केला. प्राथमिक तपासात त्यांच्याकडे ३0 लाखांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे समोर आले. त्यानंतर बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस केलेल्या तपासामध्ये त्यांच्याकडे आणखी २ कोटी ४0 लाख २६ हजार २00 रुपयांची बेहिशेबी संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. बोडखे यांनी मिळकतीपेक्षा जास्त रकमेची मालमत्ता गैरमार्गाने जमविल्याचे तपासात समोर आले आहे. कोट्यवधी रुपयांच्या अपहारातून त्यांनी खरेदी केलेली संपत्ती पाच मुले व एका भावाच्या नावावर केल्याचे उघड झाले आहे. यात त्यांची मुलं आकोट नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय बोडखे, विजय बोडखे, दीपक बोडखे, प्रमोद बोडखे, मनोज बोडखे, प्रवीण बोडखे व रामदास बोडखे यांचा भाऊ देवीदास बोडखे यांचा समावेश आहे. रामदास बोडखे यांच्या निवासस्थानांसह प्रतिष्ठानांची झाडाझडती घेण्याचे काम सुरूच असून, कागदपत्रांची तपासणीही करण्यात येत आहे. यामध्ये अडगाव बु. येथील ७ एकर शेतीसह आकोट येथील दोन घरे व अपोलो टायर दुकान असल्याचे उघड झाले आहे.
** बोडखे पिता-पुत्रांची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव
बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी आरोपी असलेल्या रामदास बोडखे यांच्यासह त्यांचे पाच पुत्र व एका भावाने अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी आकोट येथील न्यायालयात गुरुवारी अर्ज सादर केला. या अर्जावर आकोट येथील विशेष न्यायालयामध्ये सोमावारी सुनावणी होणार आहे.
** संपत्ती जप्त करा
बोडखे यांनी पदाचा गैरवापर करीत भ्रष्ट मार्गाने जमविलेली बेहिशेबी मालमत्ता शासनाने जप्त करावी व तो पैसा जनतेच्या हितासाठी वापरावा, अशी मागणी तक्रारकर्ते माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. त्यांची सर्व संपत्ती सील करण्यात यावी. हा पैसा विकासाकरिता व शेतकर्यांच्या हिताकरिता वापरण्यात यावा, अन्यथा आपला संघर्ष सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.