रामराजे बिनविरोध!
By Admin | Updated: March 21, 2015 02:22 IST2015-03-21T02:22:51+5:302015-03-21T02:22:51+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली.

रामराजे बिनविरोध!
विधान परिषद सभापती : शिवसेना-काँग्रेसची ऐनवेळी माघार; डावपेचांचे राजकारण हवेत विरले
मुंबई : विधान परिषदेच्या सभापतिपदाच्या निवडणुकीतून शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे, काँग्रेसचे शरद रणपिसे आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल करणारे अपक्ष आमदार श्रीकांत देशपांडे यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली.
गेले दोन दिवस सभापतिपदाच्या निवडीवरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपा आणि शिवसेना यांच्यात डावपेचांचे राजकारण सुरू होते. मात्र अचानक जादूची कांडी फिरल्याप्रमाणे घडामोडी घडल्या आणि अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. निंबाळकर यांची निवड जाहीर झाल्यावर सर्व सदस्यांनी सभापतींची एकमताने निवड करण्याच्या उच्च परंपरेचे पालन केल्याबद्दल आपली पाठ थोपटून घेतली.
सभापतिपदाच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा झाल्यानंतर भाजपाने आपण राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत देणार नाही. मात्र शिवसेनेनेही या निवडणुकीत तटस्थ राहावे, अशी भूमिका घेतली. ही भूमिका शिवसेनेला मान्य झाल्यानंतर महसूलमंत्री
एकनाथ खडसे, पर्यावरणमंत्री रामदास कदम व शिवसेनेच्या उमेदवार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीपूर्वी तशी घोषणा केली. तत्पूर्वी काँग्रेसने डॉ. गोऱ्हे यांना पहिल्या महिला सभापती म्हणून पाठिंबा देण्याची तयारी दाखवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची डोकेदुखी वाढली होती. यापूर्वी शिवसेनेने काँग्रेसच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड करण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली होती.
मात्र भाजपाशी चर्चा करून शिवसेनेने निवडणुकीत तटस्थ राहण्याची व उमेदवार मागे घेण्याची घोषणा केल्याने काँग्रेसचा नाइलाज झाला व त्यांनीही आपले उमेदवार शरद रणपिसे यांचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे सभापतीपदाकरिता केवळ निंबाळकर यांचा अर्ज उरल्याने भाजपा-शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय ऐनवेळी बदलून ही निवडणूक एकमताने करण्याचा निर्णय घेतला. (विशेष प्रतिनिधी)
विधान परिषदेच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार रिंगणात ठेवला आणि काँग्रेसची मते घेतली तर सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी ठेवा, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानेच शिवसेनेने नमते घेतले; तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसला विधान परिषदेतील उपसभापतिपदाचे गाजर दाखवल्याने काँग्रेसने माघार घेतल्याची चर्चा आहे.