रमजानचा उत्साह शिगेला ! खाद्य संस्कृतीची विविधता

By Admin | Updated: July 2, 2016 02:45 IST2016-07-02T02:45:50+5:302016-07-02T02:45:50+5:30

मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजानचा सण जवळ येत आहे

Ramadan enthusiasm Shigella! Variety of food culture | रमजानचा उत्साह शिगेला ! खाद्य संस्कृतीची विविधता

रमजानचा उत्साह शिगेला ! खाद्य संस्कृतीची विविधता

चेतन कंठे,

मुंबई- मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजानचा सण जवळ येत आहे. त्यामुळे सध्या मोहम्मद अली रोड, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी येथील बाजारपेठा सध्या फुललेल्या आहेत. प्रसिद्ध मोहम्मद अली रोडवर तर काजू, बदाम, पिस्ता, मनुके आणि चारोळीच्या सुवासाने पूर्ण बाजार सध्या दरवळून निघालेला आहे. सध्या आकर्षक रोषणाईसह खाद्य पदार्थांची आणि थंडगार पेय, फळांच्या सजलेल्या दुकानांमुळे मुंबईकरांची पावले आपसूकच मोहम्मद अली रोडकडे वळत आहेत.
लहान मुलांची खेळणी रस्त्यालगत गाड्यावर सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. या रोडवर येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य व नवनवीन खरेदीची उत्सुकता आणि खरेदीसाठीची लगबग मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे. घरोघरी बनवलेल्या खाद्य पदार्थांचे ताट शेजाऱ्यांना देण्याचीही रित आहे. लांबून येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार गोडधोड देऊन केला जातो.
रमजान महिन्यात उपवास म्हणजे आत्म्याची शुध्दी मानली जाते. पहाटे ४:३० वाजता सुरु झालेला उपवास संध्याकाळी ७:१५ च्या सुमारास खजूर खाऊन व पाणी पिऊन सोडला जातो. संपूर्ण महिन्यांत पाचवेळा नमाज पठण केले जाते. नियमित प्रार्थना, पवित्र धर्मग्रंथाचे वाचन आणि गरिबांना अन्न, पैसे दान करणे, या काळात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. रमजानसाठी मोहम्मद अली रोड, वांद्रे, कुर्ला, जोगेश्वरी या ठिकाणी विविध खाद्य पदार्थांना मागणी आहे. रमजानात स्पेशल पदार्थांमध्ये शेवया, मालपोवा, फिरनी, मिल्क बर्फी आणि रसमलाईला अधिक मागणी असल्याचे मिठाई विक्रेता मोहम्मद कुरेशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ईदच्या नमाज पठणासाठी पठाणी, कूर्ता-पायजमा आदींनाही सध्या बाजारात वाढती मागणी आहे. तसेच विविध फॅशनेबल कपडे शिवून घेण्यासाठीही लगबग दिसून येत आहे.
>‘आलिंगन देऊन शुभेच्छांची रीत’
रमजानचे रोजे बहुतांश मुस्लिम बांधव पाळतात. तथापि, काही विशिष्ट परिस्थितीत महिला, मुले, आजारी व्यक्तींना सूट असल्याचे धार्मिक नेते सांगतात. लहान मुले आणि प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी शक्य असेल तर इच्छेनुसार रोजा करावा, असेही सांगितले जाते. ईदला नवीन वस्त्र धारण करुन मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत जावून नमाज अदा करतात, एकमेकांना अलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा घेतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू सर्वांनाच शुभेच्छा देण्याची पारंपरिक पद्धत आहे.

Web Title: Ramadan enthusiasm Shigella! Variety of food culture