राममंदिर संतच बांधणार
By Admin | Updated: February 2, 2015 01:12 IST2015-02-02T01:12:01+5:302015-02-02T01:12:01+5:30
अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम राजकीय पक्ष नव्हे तर शंकराचार्य करणार असून विश्व हिंदू परिषद त्याला सहकार्य करू शकते, राम मंदिर कोणत्याही पक्षाचे नव्हे तर ते हिंदू धर्माचे असावे,

राममंदिर संतच बांधणार
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांची माहिती
नागपूर: अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम राजकीय पक्ष नव्हे तर शंकराचार्य करणार असून विश्व हिंदू परिषद त्याला सहकार्य करू शकते, राम मंदिर कोणत्याही पक्षाचे नव्हे तर ते हिंदू धर्माचे असावे, असे ज्योतिषपीठ व द्वारका-शारदापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अयोध्येत तीनही शंकराचार्यांद्वारा समर्थित रामालय ट्रस्ट हे मंदिराचे बांधकाम करणार असून ते कंबोडियातील अकराशे वर्षे जुन्या श्रीराम मंदिराच्या धर्तीवर असेल. विश्व हिंदू परिषदेला मात्र बिर्ला मंदिराप्रमाणे हे मंदिर बांधायचे आहे, असे शंकराचार्य म्हणाले. शिर्डी येथे होणाऱ्या साई समाधी शताब्दी महोत्सवाला त्यांनी विरोध केला. साईबाबांचा महोत्सव साजरा केल्यास सार्इंच्या नावाने हिंदू समाजात अंधविश्वास पसरेल, असे ते म्हणाले. साईबाबांना हिंदू देव-देवतांप्रमाणे सादर करण्याचा कट भारतच नव्हे तर विदेशातूनही रचला जात आहे. विष्णू, सरस्वती,श्रीकृष्ण यांच्या चित्रांवर साईबाबांचा चेहरा लावून त्यांना देवतेच्या रूपात सादर केले जाते. अशा प्रकारचे दोन संकेतस्थळ मलेशिया आणि दक्षिण आफ्रिकेतून संचालित होत आहे. यावर तत्काळ प्रतिबंध घालावा अशी मागणी सरकारकडे केली आहे, असे त्यांनी सागितले.
अलाहाबाद कुंभ मेळाव्यात झालेल्या धर्म संसदेत हिंदू धर्माच्या हितार्थ नऊ प्रस्ताव पारित करण्यात आले होते. त्यात हिंदू धर्मापुढे असलेल्या समस्यां विरुद्ध लढण्याची तयारी करणे, गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी त्यावर कुठलाही बांध न बांधणे, नाले बंद करणे, संपूर्ण देशात गोहत्या बंदी, सनातन हिंदू धर्माचे साईकरण बंद करावे, ‘पी.के.’चित्रपट रिलीज करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाला जबाबदार धरणे, हिंदूंचे धर्मांतरण समग्र स्वरूपात व्हावे, भारताची मूळ भाषा संस्कृतला प्रोत्साहन द्यावे आदींचा त्यात समावेश होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.(प्रतिनिधी)
हिंदू मुलांची संख्या वाढविणे उपाय नाही
राजकीय दृष्टिकोन ठेवून हिदूंनी मुलांची संख्या वाढविली तर प्रतिस्पर्धी अल्पसंख्यक समाजही त्याचे अनुकरण करेल. यामुळे लोकसंख्येचा स्फोट होईल. लोकसंख्या संतुलित ठेवायची असेल तर अन्य धर्मीयांनाही हिंदूं धर्माप्रमाणेच कुटुंब नियोजनाचा नियम लागू करावा,असे शंकराचार्य म्हणाले. जोपर्यंत मन आणि आचरणाने शुद्ध होत नाही तोपर्यंत ‘घर वापसी’च्या नावावर दुसऱ्यांचे धर्मांतरण करणे उपयोगी नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.