राममोहन इंग्लिश स्कूलमध्ये ‘ज्ञानमार्गिका’
By Admin | Updated: August 1, 2016 02:17 IST2016-08-01T02:17:02+5:302016-08-01T02:17:02+5:30
शाळेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व सामाजिक बांधिलकीच्या हेतूने एक नवा ‘मार्ग’ निर्माण करत नवा आदर्श निर्माण केले आहे.

राममोहन इंग्लिश स्कूलमध्ये ‘ज्ञानमार्गिका’
राज चिंचणकर,
मुंबई- ज्या शाळेने सुजाण नागरिक घडवण्याचा मार्ग दाखवला; त्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व सामाजिक बांधिलकीच्या हेतूने एक नवा ‘मार्ग’ निर्माण करत नवा आदर्श निर्माण केले आहे.
गिरगावची राममोहन इंग्लिश स्कूल ही शाळा १२ वर्षांपूर्वी बंद पडली. शाळा पुन्हा सुरु होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या एकजुटीतून आता एक अनोखी सामाजिक बांधिलकी आकाराला आली आहे. त्याचा सदुपयोग थेट पाली येथील शैक्षणिक कायार्साठी करण्यात आला आहे.
पाली येथील श्री बल्लाळ विनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आदिवासी शाळेच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम पूर्ण होऊनही त्याचा उपयोग शैक्षणिक कार्यासाठी होत नव्हता; कारण या इमारतीच्या मार्गिकेच्या बांधकामासाठी लागणारा निधी या संस्थेकडे उपलब्ध नव्हता. परिणामी, या मार्गिकेचे बांधकाम रखडले होते. ही बाब राममोहन इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या लक्षात आली आणि या विद्यार्थ्यांनी अल्पावधीत तब्बल ४ लाख ५० हजार रुपये जमवून हा निधी या संस्थेकडे सुपूर्द केला.
विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांचे हे योगदान लक्षात घेऊन या संस्थेने या मार्गिकेचे नामकरण ‘राममोहन ज्ञानमार्गिका’ असे करत या विद्यार्थ्यांच्या सामाजिक व शैक्षणिक बांधिलकीला सलाम केला आहे. नेहा कुरंभट्टी, अनिता मोंडकर, रत्नेश जव्हेरी, किरण करलकर, शैलेश जाधव आदी विद्यार्थी शाळेचे प्रतिनिधी म्हणून या मार्गिकेच्या नामकरण प्रसंगी उपस्थित होते. आमची शाळा सध्या बंद असली, शाळेची ज्ञानपताका अशीच उत्तुंग फडकवत ठेवू आणि आमच्या शाळेची दारे पुन्हा एकदा ज्ञानार्जनासाठी खुली होतील, अशी भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.