पोलिसांवरील हल्ल्याविरोधात जनजागृतीसाठी रॅली

By Admin | Updated: September 10, 2016 02:26 IST2016-09-10T02:26:26+5:302016-09-10T02:26:26+5:30

गणेशोत्सवात विविध कार्यक्रम, मिरवणूक, विसर्जनाच्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

Rally for public awareness against attack on police | पोलिसांवरील हल्ल्याविरोधात जनजागृतीसाठी रॅली

पोलिसांवरील हल्ल्याविरोधात जनजागृतीसाठी रॅली


पनवेल : गणेशोत्सवात विविध कार्यक्रम, मिरवणूक, विसर्जनाच्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी पोलीस नेहमीच प्रयत्नशील असतात. मात्र काही समाजकंटक पोलिसांशी हुज्जत घालतात. हे प्रकार थांबविण्यासाठी पनवेल, खारघर व तालुका पोलिसांच्या वतीने पनवेल शहर तसेच खारघर वसाहत आणि नेरे गावात तसेच कळंबोली पोलिसांच्या वतीने कळंबोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली होती. रॅलीत शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल बाजारे यांनी आयोजित केलेल्या रॅलीची सुरुवात शिवाजी अश्वारूढ पुतळ्यापासून करण्यात आली. यात पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना, संस्था, मोहल्ला कमिटी, शालेय विद्यार्थी, दक्षता समिती, महिला मंडळे सहभागी झाले होते. तर तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात होणाऱ्या पोलीसांवरील हल्यासंदर्भात नेरे गावात रॅली काढण्यात आली होती. विश्वेश्वर मंदिरापर्यंत रॅलीची सांगता झाली. त्यामध्ये महिला व मुलीची छेडछड होणार नाही याची दक्षता घ्यावी, न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, पोलीसांचा आदर करा, पोलीसांनी दिलेल्या सूचनाचे पालन करा, गणपतीच्या विसर्जनास अडथळानिर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच पोलीसकर्मचारी व अधिकारी यांच्याशी वाद होईल असे कृत्य करू नका. पोलीस हे जनतेचे मित्र आहेत, असा संदेश नेरे तसेच कळंबोली येथील जनतेस रॅलीतून देण्यात आला. रॅलीमध्ये तालुका पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी, पोलीस मित्र, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते.

Web Title: Rally for public awareness against attack on police