रणरणत्या उन्हात उमेदवारांच्या रॅली
By Admin | Updated: April 6, 2015 04:18 IST2015-04-06T04:18:28+5:302015-04-06T04:18:28+5:30
राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या वांद्रे (पू) मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील प्रमुख पक्षाच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी रविवारी पूर्ण दिवस प्रचाराचा

रणरणत्या उन्हात उमेदवारांच्या रॅली
मुंबई : राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या वांद्रे (पू) मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील प्रमुख पक्षाच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी रविवारी पूर्ण दिवस प्रचाराचा धडाका लावला. मतदानासाठी अवघे आठ दिवस शिल्लक राहिल्याने आजचा सुट्टीचा दिवस मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी पूर्णपणे व्यतित केला. रणरणत्या उन्हाच्या तडाख्यात रोड शो, पदयात्रा आणि कोपरा सभा घेतल्या. घामाच्या धारा वाहत असताना कार्यकर्त्यांकडून नेते व पक्षाच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला.
युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी युतीच्या उमेदवार तृप्ती सावंत यांच्यासाठी खेरवाडीत काढलेल्या रोड शोला शिवसैनिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कॉँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी पक्षाचे प्रवक्ते व जेष्ठ अभिनेते राज बब्बर यांची बहेराम पाड्यात रॅली व सभा घेण्यात आली. तर एमआयएमचे उमेदवार रहबार खान यांच्यासाठी खासदार असाउद्दीन ओवेसी यांनी भारतनगर, मिल्लत नगर परिसरात कोपरा सभा झाल्या.
सेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पक्षाच्या नेत्यांकडून त्याचा प्रचार सुरु असलातरी आज पहिल्यादा ठाकरे कुटुंबातील व्यक्ती प्रत्यक्षात प्रचारात सहभागी झाली. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी खैरवाडीत रोड शो काढला. साडेदहाच्या सुमारास त्याला प्रारंभ झाला. यावेळी सेनेचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा व शिवसेनेचा जयघोष करीत रॅली शाखा क्रमांक ९०, गोळीबार रोड मार्गे सातांकु्रझ पूर्व शिवसेना शाखा क्रं.८६ ते परत मुख्य ठिकाणावर या रोड शो ची सांगता झाली. भगवे झेडे व धनुष्यबाणच्या प्रतिकृती नाचवित शिवसैनिकांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. येत्या दोन,तीन दिवसांत सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले.
माजी मुख्यमंत्री व कॉँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी पक्षाच्या नेत्यांना पाचारण केले आहे. कॉँग्रेसमधील मुस्लिम नेते, उत्तर भारतीय नेत्यांची मदत घेतली जात आहे.