कोल्हापूर : आंदोलन केले तरच उसाला दर मिळतो, ही काहींनी खुळी समजूत करून ठेवली आहे. ‘एफआरपी’चा कायदाच असल्याने येथून पुढे आंदोलन करायची वेळच येणार नाही. आंदोलनावरून कुणी ब्लॅकमेलिंग करू नये. कायद्याप्रमाणे सर्वांना एफआरपी द्यावीच लागणार आहे. कोण जर थकवत असेल, तर त्यांना थकविण्याचे काम येथून पुढे केले जाईल, असे सांगतानाच राजू शेट्टी यांना वायफळ आत्मविश्वास नडल्याची टीका नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी केली.
हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांना पराभूत करून पहिल्यांदाच खासदार झालेले धैर्यशील माने यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शीसंवाद साधला. ते म्हणाले, देशपातळीवरील नेतृत्वाचे वेध लागलेल्या शेट्टींना मतदारसंघातील प्रश्न मात्र दिसले नाहीत. केवळउसाचे आंदोलन केले की मतदारसंघाचा विकास होत नसतो. त्यासाठी अष्टपैलू नेतृत्व हवे.