भुमिअधिग्रहन कायद्याला विरोध कायम- राजू शेट्टी
By Admin | Updated: May 30, 2015 02:03 IST2015-05-30T02:03:09+5:302015-05-30T02:03:09+5:30
बुलडाणा येथे पत्रकार परिषदेत भुमिअधिग्रहन कायद्यामध्ये दोन सुधारणा करण्याची मागणी.

भुमिअधिग्रहन कायद्याला विरोध कायम- राजू शेट्टी
बुलडाणा: भुमि अधिग्रहन कायदा हा जुना आहे. तसा हा कायदा शेतकर्यांच्या मुळावर उठलेला आहे. संसदेत आम्ही व काही घटक पक्षाने या कायद्याला विरोध दर्शविल्यामुळेच या कायद्यामध्ये केंद्र सरकारने आतापर्यंत ९ सुधारणा केल्या आहेत; मात्र अद्याप दोन सुधारणा या कायद्यामध्ये अजूनही बाकी असून जो पर्यंत ह्या सुधारणा होणार नाहीत तोपर्यंत या कायद्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध राहील अशी भुमिका खा. राजू शेट्टी यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत हे बुलडाणा जिल्ह्यात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या सोबत यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, सतिष बुरुळकर, योगेश पांडे, गजानन अमदाबादकर उपस्थित होते. खा. राजू शेट्टी म्हणाले की, आम्ही सत्तेत असतानाही शेतकर्यांच्या हीतासाठी भुमिअधिग्रहन कायद्याला विरोध केला. त्यातून सरकारला या कायद्यामध्ये ९ सुधारणा कराव्या लागल्या. अद्याप दोन सुधारणा बाकी आहेत. यामध्ये शेतकर्यांच्या परवाणगी शिवाय जमिन अधिग्रहीत करू नये आणि ५ वर्षात प्रकल्प उभा न राहल्यास जमिन शेतकर्यांना परत करावी. अशा ह्या दोन सुधारणा आहेत. ह्या सुधारणा जो पर्यंत मान्य करणार नाही तोपर्यंंत या कायद्याला आमचा विरोध असेल. स्वामीनाथन समितीच्या शिफारशी मान्य करून शेतकर्यांच्या मालाला हमी भाव द्यावे हे सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही याची खंत व्यक्त करताना शेती क्षेत्रावर भांडवली गुंतवणूक होणे आवश्यक होती, दुर्दैवाने तेही होतांना दिसत नसल्याचे खा. शेट्टी यांनी सांगीतले. यावर तुमच्या मागण्या सरकार मान्य करत नसेल तर सरकारमधून बाहेर पडणार काय? या प्रश्नाच्या उत्तरात मात्र आम्ही संघर्ष करू येवढेच उत्तर खा. राजू शेट्टी यांनी दिले.
*सरकारच्या मागे कटोरा घेवून फिरणार नाही!
केंद्रात सत्ता आल्यास सत्तेत वाटा द्यावा अशी आमची मागणी होती. विस्तारीत मंत्रीमंळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मंत्रीपद देण्याचे कबुल सुध्दा केले आहे. मात्र दिलेला शब्द पाळणे सरकार कर्तव्य आहे. आम्ही मंत्रीपदासाठी त्यांच्या मागे कटोरा घेूवन फीरणार नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत असा टोला. खा. राजू शेट्टी यांनी मारला.
*हे तर शेतकरी चळवळीचे अपयश
विदर्भातील शेतकर्यांच्या सुरू असलेल्या आत्महत्या थांबता थांबेनात, शेतकरी आत्महत्येला कारणे अनेक असतील पण ,यावर कायमस्वरूपी उपाय अद्याप आम्ही शोधू शकलो नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत हे शेतकरी चळवळीचे अपयश आहे. या बद्दल आम्हालाही आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे अशी कबुली देत खा. राजू शेट्टी म्हणाले की, आता यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपद विदर्भाला आम्ही मुद्दाम दिले. या माध्यमातून या भागात शेतकरी चळवळ उभी करून शेतकर्यांना शेतीला उद्योगाची जोड कशी देता येईल यासाठी येणार्या काळात रविकांत तुपकर काम करतील असे त्यांनी सांगीतले.