राज यांची हाराकिरी की जुगार?
By Admin | Updated: June 2, 2014 05:38 IST2014-06-02T05:38:54+5:302014-06-02T05:38:54+5:30
मनसे हा पक्ष संपूर्ण राज्यात पसरलेला नाही. त्यामुळे स्वबळावर सत्ता मिळविणे हे स्वप्न साकार करण्यासाठी लागणारी प्राथमिक बाब असलेली राज्यव्यापी संघटना या पक्षाकडे नाही

राज यांची हाराकिरी की जुगार?
ठाणे : या, मला आपल्याशी बोलायचंय, अशा भावनिक आवाहनाद्वारे विराट सभा घेऊन त्यात मी निवडणूक लढविणार अशी राज ठाकरे यांनी केलेली घोषणा म्हणजे अंतिम हाराकिरीचा जुगार आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात आणि मनसेच्याच गोटात व्यक्त होत आहे. मनसे हा पक्ष संपूर्ण राज्यात पसरलेला नाही. त्यामुळे स्वबळावर सत्ता मिळविणे हे स्वप्न साकार करण्यासाठी लागणारी प्राथमिक बाब असलेली राज्यव्यापी संघटना या पक्षाकडे नाही. तसेच मोजके जिल्हे वगळता पक्षाचा प्रभाव नाही, कार्य नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपले संख्याबळ सध्यापेक्षा वाढविणे व कुणालाच बहुमत मिळाले नाही, तर किंगमेकरची भूमिका प्राप्त करणे त्यासाठी लागणारा चेव आणि ईर्षा कार्यकर्त्यांत निर्माण करणे एवढाच हेतू या घोषणेमागे असल्याचे जाणवते. पक्षाने उभ्या केलेल्या बहुसंख्य उमेदवारांचे डिपॉझिट लोकसभा निवडणुकीत जप्त झाले. त्यामुळे पक्षाचे मनोधैर्य खचले होते. पक्षाला जिथे जिथे सत्ता मिळाली त्या नाशिक महानगरपालिका व कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिकेतील लोकप्रतिनिधींची कामगिरी अपेक्षेइतकी झाली नाही. त्यामुळे पक्षात कोणत्याच आघाडीवर समाधानकारक वातावरण नाही. राज यांची पकड संघटनेवर आहे, असेही जाणवत नाही. ज्या महापालिकेची सत्ता मनसेकडे आहे, त्या नाशिक महानगरात दरवर्षाला महानगरप्रमुख बदलण्याची वेळ राज यांच्यावर आलेली आहे. आधी नितीन भोसले, मग समीर शेटे, मग राहुल ढिकले अशी ही तिकडम नाशकात झाली आहे. विधानसभेतील गट उपनेते वसंत गीते यांच्या आग्रहाला मान देऊन महापौर दिलेल्या अॅड़ वाघ यांनी ठसा उमटवणे सोडा अस्तित्वही दाखविलेले नाही. अशीच स्थिती कल्याण-डोंबिवली व ठाणे पालिकेत आहे. ही खेळी धोकादायक आहे. कारण जर शिवसेना आणि अन्य पक्षांनी तिथे सगळी ताकद लावून राज यांचा पराभव घडविला, तर त्यातून पक्षाचे मानसिक खच्चीकरण होईल़ त्यातून पक्ष पुन्हा उभा राहणे अवघड असेल. राज यांना महायुती जवळ करणे अशक्य आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेदेखील उघड जवळ करणार नाहीत. ठाकरे घराण्याभोवतीचे जे वलय आजवर टिकून राहिले त्याचे कारण ज्या सत्तेसाठी सगळे जण साठमारी खेळतात, त्या सत्तेपासून ठाकरे कुटुंबीय सतत दूर राहत आलेले आहे. कोणतीही निवडणूक लढविणार नाही, कोणतेही सत्तापद स्वीकारणार नाही़ माझ्या दृष्टीने संघटनेचे सर्वोच्चपद हे सर्वोच्चपद आहे. अशा काहीशी नि:स्वार्थ आणि संन्यस्थ विचारांनी शिवसेनाप्रमुख आयुष्यभर वागले, म्हणून हे वलय त्यांना लाभले. परंतु त्याला ठाकरे कुटुंबाचा वारस असलेल्या राज यांनी निवडणूक लढविणार, असे घोषित करून सोडचिठ्ठी दिली आहे. मनसेतील काही सूत्र असेही सांगतात की, राज प्रत्यक्षात निवडणूक लढविणारही नाहीत़ ते सत्तेपासून दूर या राजकीय तत्त्वाशी व ठाकरे घराण्याच्या व्रताशी एकनिष्ठ राहतील़ त्यांनी केवळ पक्षात प्राण फुंकण्यासाठी निर्वाणीचा उपाय म्हणून या घोषणास्त्राचा वापर केला असावा. परंतु तसे घडले तरी राज यांच्यावर निवडणुकीच्या रणांगणातून लढण्यापूर्वीच पळ काढला, अशी टीका होऊ शकते.