गाळ्यात भरते बेलपाड्याची राजिप शाळा

By Admin | Updated: August 25, 2016 02:33 IST2016-08-25T02:33:19+5:302016-08-25T02:33:19+5:30

शासनस्तरावर मराठी शाळा टिकण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत.

Rajpi School of Belt Filling Bell | गाळ्यात भरते बेलपाड्याची राजिप शाळा

गाळ्यात भरते बेलपाड्याची राजिप शाळा

वैभव गायकर,

पनवेल- शासनस्तरावर मराठी शाळा टिकण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र दिवसेंदिवस मराठी शाळा व त्याठिकाणची पटसंख्या कमी होत आहे. खारघरसारख्या शहरात बेलपाडा गावातील राजिप शाळा पाच महिन्यांपासून भाड्याच्या खोलीत सुरू आहे. गावात असलेल्या शाळेची मोडकळीस आलेली इमारत व ग्रामस्थांच्या आपसातील वादाचा फटका ही शाळा बंद पडण्याचे कारण ठरले आहे. याबाबत रायगड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग देखील लाचार झाला असून, शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत.
सन १९५६ साली ही शाळा सुरू झाली. याकरिता काकडे कुटुंबीयांनी जागा उपलब्ध करून दिली होती. शहरात इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा सुरू झाल्या. त्याचा परिणाम मराठी शाळांच्या पटसंख्येवर झाला. बेलपाडा गावातील शाळेच्या मोडकळीस आलेल्या छपरामुळे पहिली ते पाचवी इयत्तेतील शाळा भाड्याच्या जागेत भरवावी लागली आहे. विशेष म्हणजे शाळा दुरुस्त करण्याऐवजी ग्रामपंचायत देखील पाच महिन्यांपासून या गाळ्यांचे भाडे भरत आहे. या शाळेवर दोन शिक्षक कार्यरत आहेत. मात्र वेळोवेळी पाठपुरावा करून देखील हाती काहीच लागत नसल्यामुळे शिक्षक देखील हवालदिल झाले आहेत. शेकडोच्या संख्येत असलेली पटसंख्या घसरून हाताच्या बोटावर मोजण्याइतपत येऊन ठेपली आहे. सध्या याठिकाणी केवळ ३७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही संख्या देखील भविष्यात कमी होईल. भाड्याने सुरु असलेल्या जागेत मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी जागा देखील नाही. जवळच असलेल्या रस्त्यावर हे विद्यार्थी खेळत असतात. बेलपाडा गावातील राजिप शाळा बंद अवस्थेत आहे. दुरुस्तीच्या नावाने याठिकाणाहून शाळा स्थलांतरित करण्यात आली. १९५६ पासून सुरु असलेली शाळा अचानक कशी काय बंद पडू शकते. राजिप शिक्षण विभागाचे अधिकारी याठिकाणी फिरकत देखील नाहीत ही आश्चर्याची बाब आहे. यासंदर्भात खारघर ग्रामपंचायतीच्या सरपंच सिद्धी घरत यांच्याशी संपर्कसाधला असता त्यांनी सांगितले की, शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही ग्रामस्थांच्या विरोधामुळे शाळेच्या दुरुस्तीचे काम थांबले आहे. लवकरात लवकर हा विषय मार्गी लावला जाईल.
>विशेष म्हणजे खाजगी शाळा असलेल्या कोपरा गावातील सुधागड एज्युकेशन सोसायटीची शाळा ग्रामपंचायतीने स्वखर्चाने बांधली आहे. याकरिता कोट्यवधी रु पये निधी ग्रामपंचायतीने याठिकाणी वापरला आहे. मात्र बेलपाडा गावातील शाळा दुरु स्त न करता भाड्याच्या खोलीत भरवणे हे कितपत योग्य आहे, असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे
>जिल्हा परिषदेची शाळा उभारणीसाठी आमची जागा दिली. मात्र याठिकाणी इमारत बांधताना ते आजतागायत आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही. याठिकाणी नव्याने शाळा उभारावी तसेच आजूबाजूच्या घरांना रस्ता सोडावा व या सर्वाची माहिती आम्हाला द्यावी ही मागणी आहे. शाळेला जागा देऊनही शाळेच्या कमिटीत कुटुंबातील एकाही सदस्याला घेतले नाही. या अन्यायाविरोधात आम्ही दाद मागत आहोत.
- शत्रुघ्न काकडे, ग्रामस्थ, बेलपाडा गाव, खारघर

Web Title: Rajpi School of Belt Filling Bell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.