‘राजाराम’चीच पुनरावृत्ती गोकुळमध्ये---शेतकऱ्यांचे हित हेच ‘गोकुळ’चे ध्येय : पी. एन.

By Admin | Updated: April 22, 2015 00:32 IST2015-04-22T00:06:41+5:302015-04-22T00:32:05+5:30

गोकुळ निवडणूक-- घराणेशाही हटविण्यास सभासदांमधूूनच उठाव--सतेज पाटील : चुयेकर यांच्या इच्छेखातरच पॅनेल

'Rajaram' repeated in Gokul- The goal of 'Gokul' is to benefit farmers: P N. | ‘राजाराम’चीच पुनरावृत्ती गोकुळमध्ये---शेतकऱ्यांचे हित हेच ‘गोकुळ’चे ध्येय : पी. एन.

‘राजाराम’चीच पुनरावृत्ती गोकुळमध्ये---शेतकऱ्यांचे हित हेच ‘गोकुळ’चे ध्येय : पी. एन.

महादेवराव महाडिक : विरोधकांना ‘गोकुळ’चे हायवेरूनच दर्शन; अडीच हजारांपेक्षा अधिक मताधिक्य
संतोष पाटील - कोल्हापूर
राजाराम कारखाना निवडणुकीत सूज्ञ सभासदांनी पैशांच्या जोरावर सत्ता स्थापन करू पाहणाऱ्यांचे ‘पानिपत’ केले. ‘गोकुळ’ दूध संघ हा साडेसहा लाख शेतकऱ्यांचा प्राण आहे. संघाच्या चाव्या कुणाकडे द्यायच्या, याचा निर्णय सभासदांनी यापूर्वीच केला आहे. साडेतीन वर्षांच्या मंत्रिपदाच्या काळात जिल्हा व राज्यात विकासकामांचे कोणते दिवे लावले, हे जनतेने जवळून पाहिले आहे, असा टोला माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे नाव घेता आमदार महादेवराव महाडिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना लगावला.
ते म्हणाले, दिवंगत आनंदराव पाटील-चुयेकर यांनी संघाची उभारणी केली. गेल्या वीस वर्षांत संघाचे नाव देश नव्हे, तर जागतिक पातळीवर झळकले आहे. ते निव्वळ साडेसहा लाखांहून अधिक दूध उत्पादक शेतकऱ्यांचा संचालक मंडळाने संपादित केलेल्या विश्वासाच्या जोरावरच. ‘गोकुळ’च्या ३२०० पैकी किमान अडीच हजारांपेक्षा अधिक सभासद आमच्यासोबत आहेत. त्यातील १८०० सभासद यापूर्वीच सहलीवर गेले आहेत. मंगळवारी रात्री आणखी अडीचशे मतदार सहलीवर जात आहेत. सभासदांचा असलेल्या प्रचंड विश्वासाच्या जोरावरच मोठ्या मताधिक्याने सत्ताधारी आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील. विरोधकांना पॅनेल करताना उमेदवारही मिळाले नाहीत. त्यामुळे ‘गोकुळ’चा कृष्ण होऊ पाहणाऱ्या विरोधकांना संघाचे दर्शन ‘नॅशनल हाय-वे’ वरूनच घ्यावे लागेल. सत्ता काबीज करण्याचा त्यांचा मनसुबा कदापि पूर्ण होणार नाही. विजयाची औपचारिकता शुक्रवारी पूर्ण होईल, असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला.गोकुळ संघ बेळगावला जाताना डाव्या बाजूला, तर येताना उजव्या बाजूला आहे. राष्ट्रीय महामार्गावरून जाताना इतकेच काय ते संघाची छाया विरोधकांना दिसेल. सत्ता काबीज करणे लांबच, ‘गोकुळ’च्या गेटपर्यंतही विरोधक पोहोचू शकणार नाहीत. याची खबरदारी सूज्ञ सभासदांनी घेतली आहे. मंत्री असताना यांनी जिल्ह्याचा विकास किती केला, हे जनतेने जवळून पाहिले आहे. त्यामुळे ‘राजाराम’सारखे पैशांच्या जोरावर गोकुळ काबीज करण्याचे मनसुबे सूज्ञ सभासद उधळून लावल्याखेरीज राहणार नाहीत, असेही महाडिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता ठणकावून सांगितले.
सर्वसामान्य जनता हीच महाडिकांची ताकद आहे. महाभारतात कुरुक्षेत्रावर घडल्याप्रमाणे ज्या बाजूला श्रीकृष्ण त्या बाजूला विजय निश्चित असतो. त्यामुळे ‘गोकुळ’चा ‘कृष्ण’ होण्याचे दुसऱ्या कोणी प्रयत्न करू नये. ‘गोकुळ’ची सत्ता महाडिक व पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाच्याच हातात द्यायची, हे सभासदांनी पक्के ठरविले आहे. त्याची प्रचिती दोन दिवसांतच येईल, असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला.



शेतकऱ्यांचे हित हेच ‘गोकुळ’चे ध्येय : पी. एन.
भारत चव्हाण- कोल्हापूर
वैयक्तिक राजकारण व मतभेद बाजूला ठेवून केवळ शेतकऱ्यांचे आर्थिक हित डोळ्यासमोर ठेवून ‘गोकुळ’ दूध संघाचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालविला जातो. दुधाचा दर्जा आणि शेतकऱ्यांना चांगला दर देताना तडजोड केली नाही. यापुढेही दैनंदिन दूध संकलनाची क्षमात २० लाख लिटरपर्यंत वाढवून शेतकऱ्यांना आणखी चांगला दर कसा देता येईल, याकडे लक्ष देणार आहोत, असे सत्ताधारी पॅनेलचे प्रमुख पी. एन. पाटील यांनी ‘लोकमत’ला भूमिका मांडताना सांगितले.
जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांचे संसार ‘गोकु ळ’ने फुलविले आहेत. राज्यात सगळीकडेच ऊस पिकविणारे शेतकरी अडचणीत आले आहेत; परंतु कोल्हापुरात ‘गोकुळ’ने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. ‘गोकुळ’ प्रत्येक महिन्यात तीनवेळा दुधाचे बिल भागवितोय. आठवड्याला १८ ते २० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. गेल्यावर्षी ४५ कोटी रुपयांचा लाभांश दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, सध्या ‘गोकुळ’चे प्रतिदिन १० ते १२ लाख दूध संकलन होत आहे. आम्ही बाहेरून तीन लाख लिटर दूध खरेदी करतोय. प्रतिदिन २० ते २५ लाख दूध संकलन कसे होईल याकडे आमचे लक्ष आहे. त्यासाठी जिल्ह्यात जनावरांची संख्या वाढविणे आणि बाहेरील संघांचे दूध खरेदी करणे हे आमचे ध्येय आहे. केडीसीसी बॅँकेमार्फत शेतकऱ्याना एक म्हैस अथवा गाय खरेदी करण्यासाठी कर्ज दिले जात होते. मी अध्यक्ष असताना त्यात बदल करून प्रत्येकी आठ ते दहा म्हशी व गोठ्यासह कर्जप्रकरण करून शेतकऱ्यांना मदत केली. त्याची चांगली फळं आज मिळत आहेत. भविष्यातही जनावरांची संख्या वाढविण्यावर आम्ही भर देणार आहोत.
ते म्हणाले, दुधाच्या दर्जात कधीही तडजोड केली नाही, म्हणूनच आमच्या दुधाला मुंबई, पुणे, गोवा, कोकण येथून चांगली मागणी आहे. आपला कार्यकर्ता आहे म्हणून कोणाचे हलके दूध स्वीकारले नाही किंवा त्यांना सांभाळून घ्या, असेही अधिकाऱ्यांना सांगितले. राजकारण म्हणून कधी ‘गोकुळ’कडे कधी पाहिले नाही. एक उद्योग म्हणूनच त्याच्याकडे पाहतो. त्यामुळेच शेतकऱ्यांना चांगला आधार मिळाला. ‘गोकुळ’च्या दुधाचा स्वाद चांगला असल्यामुळे स्वाभाविकच आमच्या दूध पावडरला परदेशी बाजारपेठेत चांगली मागणी होती, परंतु केंद्रात सरकार बदलले आणि दूध पावडर परदेशात निर्यात करण्यास बंदी घालण्यात आली. सरकारचे धोरण आम्हाला कळाले नाही; पण या निर्णयामुळे गेल्यावर्षी आमची ७० कोटी रुपयांची पावडर शिल्लक राहिली. ती खपविण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे पाटील यांनी सांगितले. भविष्यकाळात संकलन क्षमता आणि विक्री वाढविणे, नवीन शहरातील बाजारपेठेत स्थान मिळविणे तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ‘गोकुळ’चा कारभार विस्तारणार आहोत. एक आदर्श दूध संघ म्हणून ‘गोकुळ’ला देशात नावलौकिक मिळवून देणे, हेच आमचे ध्येय आहे, असेही पाटील म्हणाले.


महाडिकांनी एकदा दोस्ती केली की ती निभावतोच. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील व मी एक आहोत, एकच राहणार. यापुढील भविष्यातील राजकीय वाटचालीतहीसुद्धा पी. एन. पाटील यांच्या सोबतच असेल.
- आमदार महादेवराव महाडिक




घराणेशाही हटविण्यास सभासदांमधूूनच उठाव
सतेज पाटील : चुयेकर यांच्या इच्छेखातरच पॅनेल
राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर
राजकीय द्वेषातून नव्हे, तर गेल्या पाच वर्षांत सामान्य दूध उत्पादकांमधून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ज्या तक्रारी येत होत्या, त्या सोडविण्यासाठी ‘गोकुळ’ दूध संघाच्या रिंगणात उतरलो आहे.
अनेक संचालक ३०-४० वर्षे गोकुळ ही घराण्यांची मालकी असल्यासारखे तळ ठोकून बसले आहेत. ही घराणेशाही उलथवून टाकण्यासाठीच या निवडणूकीत सभासदांमधूनच उठाव झाल्याची माहिती राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलचे प्रमुख, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ‘गोकुळ’चे संस्थापक आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या इच्छेखातरच आपण पॅनेल केले आहे. त्यांच्या विचारानेच संघात कारभार करु असा दावाही पाटील यांनी केला.
सतेज पाटील म्हणाले, ‘गोकुळ’वर जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादकांचे जीवन अवलंबून आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी सत्ताधारी मंडळींच्या कारनाम्यांबद्दल तक्रारी केल्या. छापील वजनापेक्षा कमी वजनाचे पशुखाद्याचे पोते, वासाचे दूध अशा अनेक तक्रारी उत्पादकांच्या आहेत. अन्न व औषध प्रशासन खाते माझ्याकडे होते, त्यावेळी अधिकाऱ्यांनी भेटून काही गोष्टी सांगितल्या होत्या. गोरगरिबांचा ‘गोकुळ’ संघ टिकला पाहिजे, यासाठी संघाच्या कारभारात लक्ष घालण्यास स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांनी सांगितले होते. त्यांनीही अनेक वेळा चुकीच्या पायंड्याबाबत थेट तक्रारी केल्या होत्या. ‘गोकुळ’चा सगळा कारभार काही मंडळींनी हायजॅक केला आहे. त्यांची मक्तेदारी मोडून काढण्याचा निर्धार सभासदांनी केल्याने ‘गोकुळ’मध्ये परिवर्तन अटळ आहे. लोकसभा निवडणुकीत आपला व माजी मंत्री विनय कोरे यांचा राष्ट्रवादी कॉँग्रेसने केवळ वापर करून घेतला. राजाराम साखर कारखान्यात सत्ताधाऱ्यांचा नैतिक पराभव झाला आहे. या निकालाचा ‘गोकुळ’च्या निवडणुकीवर परिणाम होणार नाही.


मिनिटात दूध चांगले ?
जाणीवपूर्वक रोटेशन पद्धतीने संस्थांचे दूध वासाचे काढण्याची परंपरा ‘गोकुळ’मध्ये आहे. रोज असे हजारो लिटर दूध गोळा होत आहे. दूध संस्थांनी तक्रारी केल्या तर दखल घ्यायची नाही. बड्या कार्यकर्त्यांचा दमदाटीचा फोन गेला की वासाचे दूध लगेच चांगले करून दिले जाते. यामागील गौडबंगाल काय ?

अडीच लाख वासरे आहेत कोठे ?
जिल्ह्यात अडीच लाख वासरांना अनुदानाच्या रूपात कोट्यवधी रुपयांचे वाटप केले आहे. यातील निम्मी वासरे जरी दुधाखाली आली असती, तर संघाचे दूध रोज पाच लाख लिटरनी वाढले असते; पण इतर जिल्ह्यांतील दूध गोळा करून संकलनाच्या उच्चांकाचा डांगोरा पिटण्यापलीकडे सत्तारूढ गटाने काहीच केले नसल्याची टीका पाटील यांनी केली.

Web Title: 'Rajaram' repeated in Gokul- The goal of 'Gokul' is to benefit farmers: P N.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.