राजाराम महाविद्यालयाचे विद्यार्थी ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ
By Admin | Updated: January 3, 2015 00:47 IST2015-01-03T00:46:10+5:302015-01-03T00:47:38+5:30
गोवारीकरांच्या नजरेतून कोल्हापूरचे --विसंवाद आजही कायम...द्रष्टेपण--‘राजाराम’मध्ये चार वर्षे

राजाराम महाविद्यालयाचे विद्यार्थी ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ
कोल्हापूर : बी.एस्सी. पदवी घेतली, त्या राजाराम महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सव समारोप सोहळ्यात त्रिवेंद्रमच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालकपदी असलेले डॉ. वसंतराव गोवारीकर हे प्रमुख पाहुणे होते. १३ मार्च १९८१ रोजी झालेल्या भव्य सोहळ्यात गोवारीकर यांनी सुरेख इंग्रजीत राजाराम महाविद्यालय, विविध क्षेत्रांत ठसा उमटविणारे राजारामियन आणि दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींचे कोल्हापूर याबाबत प्रकट चिंतन केले. जागतिक किर्तीचे अवकाश शास्त्रज्ज्ञ गोवारीकर या कार्यक्रमाला येणार असल्याने विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी गर्दी केली होती.कोल्हापूरच्या एकंदरीत सांस्कृतिक जीवनाचा अनमोल ठेवा असलेल्या राजाराम महाविद्यालयाचा परिसर यादिवशी आजी-माजी राजारामियन्स्नी फुलून गेला होता. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती, जनरल एसपीपी थोरात, विद्यापीठाचे कुलगुरू रा. कृ. कणबरकर, महापालिका आयुक्त दिलीप करंदीकर, महापौर बाबूराव पारखे, ‘राजाराम’चे प्राचार्य रा. नि. ढमढेरे, आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी डॉ. गोवारीकर यांनी शास्त्रज्ञाला शोभेल असे सुरेख इंग्रजीत प्रकट चिंतन केले. गेल्या काही वर्षांत देशाच्या विविध क्षेत्रांत झालेल्या प्रगतीला जे कारणीभूत ठरले, त्यांच्या निष्ठांचे प्रतिनिधित्व राजाराम महाविद्यालय करते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. गत काही वर्षांत तंत्रज्ञानातील विकासाचे श्रेय त्यांनी ‘राजाराम’सारख्या संस्थांना दिले. अणुसंशोधन, अवकाश-तंत्रज्ञान, शेती या सर्व क्षेत्रांतील प्रगतीमध्येही दृष्ट्या राजारामियनांचा वाटा असल्याची ग्वाही दिली. पूर्वीच्या काही लोकांनी अशा संस्था स्थापन करण्यात दूरदृष्टी दाखविली, असे द्रष्टे कोल्हापूरमध्ये होते. तंत्रज्ञानात भारत पूर्वी मागासलेला होता, पण, म्हादबा मेस्त्री व पंडितराव कुलकर्णीसारखी माणसं कोल्हापूरकरांनी निर्माण केली.
(राजाराम महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवातील स्मरणिकेतील प्रा. ब. शी. कुलकर्णी यांच्या लेखातून साभार)
विसंवाद आजही कायम...
‘राजाराम’मधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी, नव्या भारताचे एक महाकाव्य निर्माण केल्याचे मत डॉ. गोवारीकर यांनी व्यक्त केले होते. देशातील सामाजिक परिस्थितीचा ऊहापोह करताना ते म्हणाले होते की, आज एकीकडे विज्ञानाची प्रगती होते आहे, तर दुसरीकडे अंधश्रद्धा, गरिबी आणि श्रीमंतीतील दरी वाढते आहे. एका दुभंगलेल्या जगात वावरतो आहोत, पण, अशा महाविद्यालयातून बाहेर पडलेल्यांवर या दुभंगलेपणाचा परिणाम होत नाही. हा विसंवाद दूर करण्यासाठी आवश्यक दृष्टी इथे मिळालेली असते.
‘राजाराम’मध्ये चार वर्षे
गोवारीकर यांनी १९५८ मध्ये पी. डी. सायन्स्साठी राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी येथून बी.एस्सी. फिजिक्सची पदवीदेखील घेतली तेथून ते उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेले.