राजन साळवींनीउद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचे कारण काही वेळापूर्वीच सांगितले आहे. २०२४ चा पराभव माझ्या जिव्हारी लागला असल्याचे साळवी म्हणाले. या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्या विरुद्ध काम केले. विनायक राऊत हेच माझ्या पराभवाला कारणीभूत आहेत. त्यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे, असे साळवी यांनी आज जाहीर केले. विनायक राऊत यांनी माझ्याविरोधात काम केल्याचा गंभीर आरोप साळवी यांनी केला आहे. परंतू, कुडाळ-मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
राजन साळवींचे विनायक राऊतांवर गंभीर आरोप; उद्धव ठाकरेंची साथ का सोडली, कारण सांगितले...
राजन साळवीशिवसेना सोडत असताना त्यांना थांबविण्याचा आपणही प्रयत्न केल्याचा दावा नाईक यांनी केला आहे. राजन साळवी हे खरे जुने शिवसैनिक होते. मी त्यांना बोललो की, तुम्ही शिवसेनेत राहा. आज वेळ जरी वाईट असली तरी पुन्हा आपली वेळ येईल. पुन्हा आपण कार्यकर्त्यांना उभे करूया. तुमच्यासारखे कार्यकर्ते हे सत्ता आणि पदासाठी कधीही नव्हते आणि पुढे नसणार, असे त्यांना समजावले होते, असे नाईक यांनी सांगितले.
यावर साळवी यांनी आपल्याला सांगितले की, पक्षातल्या लोकांचा माझ्यावर विश्वास राहिला नाही. मी विधान परिषदेला मतदानच केले नाही असे पक्षातील काही लोकांचे म्हणणे आहे, असे ते म्हणाल्याचे नाईक यांनी सांगितले. तसेच साळवी यांच्या ज्या काही भूमिका होत्या त्या वरिष्ठांनी ऐकल्या आहेत. त्यांच्याबद्दल काय निर्णय झाला मला माहीत नाही, असेही नाईक यांनी स्पष्ट केले. त्यांनी काय निर्णय घ्यावा? हा त्यांचा प्रश्न आहे. मी मात्र सामान्य शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.