राज - उद्धव मनोमिलन होणार का? - बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी चर्चेला उधाण
By Admin | Updated: November 17, 2014 16:17 IST2014-11-17T16:17:16+5:302014-11-17T16:17:43+5:30
राज व उद्धव यांचं मनोमिलन होणार का याकडे पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राज - उद्धव मनोमिलन होणार का? - बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी चर्चेला उधाण
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर श्रद्धांजली वाहण्यासाठी राज ठाकरे आले, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बराच वेळ चर्चा केली आणि राज व उद्धव यांचं मनोमिलन होणार का याकडे पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या काही दिवस आधीच मी एकत्र येण्याची तयारी दाखवली होती, परंतु उद्धव पुढे आला नाही असे राज यांनी जाहीर केले होते. कधी कुणी टाळीला हात पुढे केला तर दुस-याने टाळी दिली नाही असे अनेकवेळा झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर मात्र उद्धव व राज एकत्र येणार या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.
मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे खास सहकारी मानले जाणारे बाळा नांदगावकर यांनी तमाम मराठीजनांची इच्छा आहे की या दोघांचे मनोमिलन व्हावे. ते कधी होईल हे माहित नाही, परंतु ते व्हावा अशीच आपली इच्छा असल्याचे ते म्हणाले.
तर छगन भुजबळांसारख्या राजकीय विरोधकांनी व पुर्वाश्रमीच्या शिवसैनिकांनीही राज व उद्धव यांनी एकत्र यावे असे मत वारंवार प्रकट केले आहे. आत्तापर्यंत केवळ कौटुंबिक संबंध जोपासायचे व राजकीय विरोधकाची भूमिका बजावायची असा पवित्रा शिवसेना व मनसे प्रमुखांनी घेतला होता. मात्र, लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये मनसेचे पानिपत झालं आणि राज्यात तर शिवसेनेला पुन्हा विरोधात बसायची वेळ आली. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही भावांनी एकत्र येणं ही राजकीय गरज आहे की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
राज ठाकरे यांनी निवडणुकांदरम्यान एकत्र येण्याचा मानस व्यक्त केला होता, जो उद्धवनी झिडकारला. आताही उद्धव काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.