राज ठाकरे यांचे लोकसभानिहाय मेळावे
By Admin | Updated: April 24, 2017 03:52 IST2017-04-24T03:52:50+5:302017-04-24T03:52:50+5:30
सलगच्या पराभवामुळे पक्ष संघटनेला आलेली मरगळ झटकण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे लोकसभा मतदारसंघनिहाय मेळावे घेणार आहेत.

राज ठाकरे यांचे लोकसभानिहाय मेळावे
मुंबई : सलगच्या पराभवामुळे पक्ष संघटनेला आलेली मरगळ झटकण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे लोकसभा मतदारसंघनिहाय मेळावे घेणार आहेत. दादर येथील राजगड कार्यालयात रविवारी मनसे नेत्यांची बैठक झाली. यात मेळाव्याच्या तयारीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
लोकसभा, विधानसभा आणि अलीकडेच महापालिका निवडणुकीत मनसेला पराभवाचा सामना करावा लागला. पालिका पराभवानंतर पक्षाच्या वर्धापन दिनी बोलताना, हा आपला शेवटचा पराभव असेल, असे राज म्हणाले होते. मी स्वत: तुमच्याशी संवाद साधायला येईन, असेही ते म्हणाले होते. त्यानुसार मे महिन्यात मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदारसंघांत कार्यकर्ते मेळावे होणार असून त्याला राज ठाकरे संबोधित करणार आहेत. मनसेचे नेते, सरचिटणीस तसेच विभाग अध्यक्षांच्या या बैठकीत पक्षांतर्गत नाराजीबाबतही चर्चा झाली. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर नेते व सरचिटणीस बदलाबाबत राज ठाकरे निर्णय घेतील, असे बैठकीत मान्य करण्यात आले.
९ नेते, ९ सरचिटणीस आणि तब्बल ७ प्रवक्ते अशी फळी असतानाही योग्य पद्धतीने कामे झाली नाहीत. महापालिका निवडणुकीत बहुतेक नेत्यांनी त्यांना सोपविलेले काम योग्य प्रकारे पार पाडले नाही. उलट उमेदवारी देताना अनेक घोळ घातल्याचा आरोप स्थानिक पदाधिकारी आणि मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर हे मेळावे घेण्याचा निर्णय राज यांनी घेतला आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांत मे महिन्यात राज हे मेळावे घेणार आहेत. (प्रतिनिधी)