हत्याकांडाच्या तपासासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार - राज ठाकरे
By Admin | Updated: November 1, 2014 21:54 IST2014-11-01T16:45:54+5:302014-11-01T21:54:06+5:30
जवखेड येथील भीषण हत्याकांडाचा तपास लागावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पाठपुरावा करमार असे आश्वासन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले.

हत्याकांडाच्या तपासासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार - राज ठाकरे
>ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. १ - जवखेड येथे झालेले हत्याकांड अतिशय भीषण असून यातील गुन्हेगारांच्या शोधासाठी व तपासासाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करणार आहे, असे आश्वासन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले. जवखेडा येथे ११ दिवसांपूर्वी झालेल्या दलित हत्याकांडातील पीडित कुटुंबियांची राज ठाकरे यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सदर प्रकार अतिशय दुर्दैवी असून त्या गुन्हेगारांचा शोध लावून त्याना कठोर शासन व्हावे यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचा तसेच या प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी नवे मुख्यमंत्री फडणवीस हे चांगले नेते असून ते चांगला कारभार करतील अशी अपेक्षाही व्यक्त केली. नव्या सरकारपर्यंत आधीच शुभेच्छा पोचवल्याचे सांगत शपथविधीला अनुपस्थित राहिलो याचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये असेही ते म्हणाले.
दरम्यान या हत्याकाडांतील आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याच्या निषेधार्थ लातूरमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. संतप्त आदोलकांनी रस्त्यावरील गाड्या व दुकानांच्या काचा फोडत निषेध व्यक्त केल्याने शहरात तणावाचे वातावरण आहे.
पराभवावर बोलण्यास नकार
विधानसभा निवडणुकीतील मनसेच्या दारूण परावभाबद्दल मात्र काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. या अपयशाबाबत संपूर्ण माहिती घेऊन कारणामीमांसा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.