शिवसेनेबाबत मनसेची भूमिका राज ठाकरेच ठरवतील
By Admin | Updated: February 27, 2017 16:02 IST2017-02-27T16:02:28+5:302017-02-27T16:02:28+5:30
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसह भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानंतर, सत्ता स्थापनेसाठीच्या दोन्ही पक्षाच्या राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत

शिवसेनेबाबत मनसेची भूमिका राज ठाकरेच ठरवतील
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसह भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानंतर, सत्ता स्थापनेसाठीच्या दोन्ही पक्षाच्या राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. शिवसेना/भाजपा सत्ता स्थापनेसाठी कोणाची मदत घेणार? या विषयी राजकीय विश्लेषकांची मतमतांतरे असतानाच, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत मुंबई महापालिकेत मनसेची भूमिका काय असेल यावर खुलासा केला आहे. मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक 9 मार्च रोजी होणार आहे.
मनसे आणि शिवसेना महापालिकेत एकत्र आले असते तर शिवसेनेच्या जागा वाढल्या असत्या आणि शिवसेनेवर आज ही वेळ आली नसती असे मीडियाच सांगत आहे. त्यामुळे आमची त्यावेळची भूमिका योग्यच होती, हेच यातून दिसून येत आहे. पण निवडणुकीत कोणी-कोणाचाही कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू असत नाही. राजकारणात लवचिकता महत्त्वाची असते. कोणत्यावेळी लवचिक व्हायचं हे कळायला हवं. शिवसेनेबाबत लवचिक व्हायचं की नाही हा निर्णय राज ठाकरे घेतील. असे बाळा नांदगावकर म्हणाले.
मराठी अस्मितेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा निर्णय अंतिम निर्णय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेच घेतील आणि हा निर्णय मराठी माणसाच्या हितासाठीच असेल,असे सांगत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेना- मनसे युतीच्या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फोडले आहे. त्यामुळे शिवसेनेला मनसे टाळी देण्याची शक्यता बळावली आहे.