त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र या निर्णयाला तीव्र विरोध झाल्यानंतर अखेर मराठीप्रेमींच्या दबावासमोर झुकत या संदर्भातील शासन आदेश रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला होता. या निमित्ताने मराठी माणूस आणि मराठी भाषेच्या हितासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे एकत्र आले. तसेच हिंदी सक्तीचा आदेश रद्द करण्यास भाग पाडल्यानंतर आता आज होत असलेल्या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. दरम्यान, या मेळाव्याला मराठी माणसांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून, आता आज होत असलेल्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यासुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने लागू केलेल्या हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन महामोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र तत्पूर्वीच राज्य सरकारने हा जीआर रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर विजयी सभा आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली होती. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे या सभेला उपस्थित राहतील असे जाहीर करण्यात आले होते. सोबतच सर्व मराठीप्रेमींनी या सभेला उपस्थित राहावे, असं आवाहन करण्यात आले होते. या सभेला महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शरद पवार गटाचे नेते उपस्थित राहतील असे बोलले जात होते.
मात्र काँग्रेसकडून आजच्या सभेला बडे नेते उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे शरद पवार यांनीही पूर्वनियोजित कार्यक्रमांचा हवाला देऊन या सभेला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली होती. पण शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या आजच्या सभेला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. तसेच सुप्रिया सुळे यांचं यावेळी भाषणही होणार असल्याचं सांगितलं जात आहे.