राज ठाकरेंनी पूर्ण वेळ व्यंगचित्रकार व्हावे - भाजपाचे प्रत्युत्तर
By Admin | Updated: February 13, 2015 15:01 IST2015-02-13T14:57:08+5:302015-02-13T15:01:59+5:30
'राज ठाकरे यांना पुन्हा प्रसिद्धीत यायची संधी मिळाली असून त्यांनी आता पूर्ण वेळ व्यंगचित्रकार व्हावे' असा खोचक सल्ला आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना दिला आहे.

राज ठाकरेंनी पूर्ण वेळ व्यंगचित्रकार व्हावे - भाजपाचे प्रत्युत्तर
ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि. १३ - दिल्लीत भाजपाच्या पराभवावर व्यंगचित्राद्वारे टीका करणारे मनसेअध्यक्ष राज ठाकरेंना भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विटरद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. 'राज ठाकरे यांना पुन्हा प्रसिद्धीत यायची संधी मिळाली असून त्यांनी आता पूर्ण वेळ व्यंगचित्रकार व्हावे' असा खोचक सल्ला आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना दिला आहे.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत आपसारख्या नवख्या पक्षाने भाजपाचा दारुण पराभव केल्याने भाजपावर विरोधक आणि मित्रपक्षांकडून जोरदार टीका होत आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला कानपिचक्या दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदींचे कौतुक करणारे राज ठाकरेंनेही दिल्लीतील पराभवानंतर मोदींवर निशाणा साधला होता. दिल्लीत मोदींचा पराभव झाला असे त्यांनी सांगितले होते. राज ठाकरे ऐवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी थेट कुंचला हाती घेऊन दिल्ली विधानसभेच्या भाजपाच्या पराभवर टीका करणारे व्यंगचित्रच रेखाटले. यामध्ये अमित शहा व नरेंद्र मोदी हे भाजपाचे ट्विन टॉवर्स आप झाडूने उध्वस्त केेले असे या व्यंगचित्रातून दाखवण्यात आले होते.
राज ठाकरेंच्या व्यंगचित्रावर भाजपाचे मुंबईतील नेते आशिष शेलार यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. 'राज ठाकरे यांना व्यंगचित्रामुळे पुन्हा प्रसिद्धीझोतात येण्याची संधी मिळाली. आता त्यांनी पूर्णवेळ व्यंगचित्रकार म्हणून काम करावे' असे शेलार यांनी म्हटले आहे.