शिवसेना-भाजपाच्या 'तू तू - मैं मैं' वर आज काय बोलणार राज ठाकरे
By Admin | Updated: February 14, 2017 14:56 IST2017-02-14T14:50:09+5:302017-02-14T14:56:05+5:30
व्यक्तीगत आरोप-प्रत्यारोपांभोवती शिवसेना-भाजपाचा प्रचार फिरत असताना आजपासून निवडणुकीच्या रणमैदानात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रवेश होत आहे.

शिवसेना-भाजपाच्या 'तू तू - मैं मैं' वर आज काय बोलणार राज ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - विकासाच्या मुद्यांपेक्षा व्यक्तीगत आरोप-प्रत्यारोपांभोवती शिवसेना-भाजपाचा प्रचार फिरत असताना आजपासून निवडणुकीच्या रणमैदानात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रवेश होत आहे. शिवसेना-भाजपाने आठवडाभरआधीपासूनच प्रचारात आघाडी घेतलेली असताना मनसेचा प्रचारात जोर दिसत नव्हता.
आता राज यांच्या भाषणांमुळे उत्साह हरवलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण होईल आणि मनसेसुद्धा चर्चेत येईल अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. मुंबईत आज विक्रोळी आणि विलेपार्ले येथे राज यांच्या दोन सभा होणार आहेत. सुरुवातील त्यांनी एकूण 36 सभा घेण्याचा निर्णय घेतला होता. पण पुढच्या पाच दिवसात ते फक्त सहा सभा घेणार आहेत.
शिवसेना आणि भाजपा दोघांकडून विकासाचे दावे करताना परस्परांवर चिखलफेक केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर आज राज ठाकरे काय बोलणार ?, नाशिकमधल्या पाचवर्षाच्या सत्तेचा कसा हिशोब देणार ? मतदारांमध्ये मनसेबद्दल पुन्हा विश्वास निर्माण करण्यात यशस्वी होणार का ? त्या प्रश्नांची उत्तरे आज मिळतील. दीवा, पुणे, नाशिक आणि त्यानंतर होम ग्राऊंड दादरमध्ये 18 फेब्रुवारीला राज यांची प्रचाराची शेवटची सभा होणार आहे.