मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा (Uddhav Thackeray Birthday) देण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत. यामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
१८ वर्षांपूर्वी राज यांनी मातोश्री सोडली होती. यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ५ जानेवारी २०१९ रोजी आले होते. आज राज यांनी पुन्हा मातोश्रीची पायरी चढली आहे. उद्धव ठाकरेंचा ६५ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले असले तरी याकडे युतीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. राज यांच्यासोबत नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर हजर होते.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने मातोश्री फुलांनी सजविण्यात आली होती. आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंना काय भेट देतात, युती करतात की बोलणी करतात याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.