मतदारांनी आणले राज ठाकरेंना जमिनीवर
By Admin | Updated: May 17, 2014 04:45 IST2014-05-17T04:45:50+5:302014-05-17T04:45:50+5:30
हिंदी सिनेमाचे एक गाजलेले गाणे आहे. त्या गाण्यासारखी अवस्था आज मनसेची आणि राज ठाकरे यांची झाली आहे. ‘बंद थी मुठ्ठी लाख की.... अब खुल गयी तो हुयी खाक की...’

मतदारांनी आणले राज ठाकरेंना जमिनीवर
हिंदी सिनेमाचे एक गाजलेले गाणे आहे. त्या गाण्यासारखी अवस्था आज मनसेची आणि राज ठाकरे यांची झाली आहे. ‘बंद थी मुठ्ठी लाख की.... अब खुल गयी तो हुयी खाक की...’ या अवस्थेला आपण का आलो याचे उत्तर देण्यासाठी मनसेचा एकही नेता आज पुढे आला नाही. आपले उमेदवार निवडून आल्यानंतर मोदींना पाठिंबा देतील, असे सांगत शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे करण्याच्या रणनीतीपासून ते ‘माझी औकात काढता काय... आता मी माझी औकातच दाखवून देतो़ बाळासाहेब आजारी असताना मी सूप नेऊन देत होतो.’ अशी विधाने करेपर्यंत सतत ठरवून, मोजूनमापून प्रत्येक गोष्ट करणार्या राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी केलेली खेळी आणि विधाने अखेर त्यांच्याच अंगाशी आली. आपण लोकसभेसाठी उमेदवार उभे करायचे की नाही हे अजूनही ठरवलेले नाही, असे सांगत असतानाच अचानक राज ठाकरे यांनी नऊ जागी उमेदवार उभे केले. मोदींना पाठिंबा जाहीर करून त्यांनी अतिशय धूर्त राजकीय खेळी खेळली, मात्र त्यातल्या सात जागी त्यांनी शिवसेनेच्याच विरोधात उमेदवार दिले आणि केवळ दोन ठिकाणी भाजपाच्या विरोधात उमेदवार दिले. मोदींना पाठिंबा देण्याची धूर्त चाल पुढे मात्र त्यांना खेळता आली नाही. पुढे त्यांनी औकातीचा विषय काढला़ त्या भाषेने त्यांच्यावर प्रेम करणारे खट्टू झाले़ मात्र त्याही पुढे जाऊन त्यांनी बाळासाहेबांना कसलातरी तेलकट वडा खायला दिला जात होता, म्हणून मी सूप नेऊन देत होतो असे सांगून अनेकांची टोकाची नाराजी ओढवून घेतली. या दोन गोष्टी घडेपर्यंत राजच्या पक्षाने निवडणुका लढवूच नयेत का, अशी त्यांची वकिली करणारे देखील नंतरच्या या दोन विधानांमुळे दुखावले गेले. मोजूनमापून वागणार्या राज यांच्याकडून ही अपेक्षा न करणार्यांच्या जिव्हारी या गोष्टी लागल्या. त्या उलट उद्धव ठाकरे यांनी मात्र या विषयावर आपल्याला काहीही बोलायचे नाही, अशी संयमी भूमिका घेतल्याने तर राज यांची आणखीनच बिकट परिस्थिती निर्माण झाली. मनसे म्हणजे काँग्रेसने टाकलेला सापळा आहे, असे उद्धव ठाकरेंचे विधानदेखील राज यांना खोडता आले नाही. त्यात राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांनी राज ठाकरेंचे कौतुक आणि उद्धव यांच्यावर टीका करीत या सापळ्यात राज यांना पुरते अडकवून टाकले. २००९ साली लोकसभेसाठी १२ उमेदवार उभे करीत मनसेने मराठी मतांचे विभाजन करीत काँग्रेस राष्टÑवादीचे ११ उमेदवार निवडून आणण्यात मदत केल्याची आकडेवारी समोर होती. राज यांच्याकडे नवा कोणताही मुद्दा नव्हता. या सार्यांचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि त्यांची २००९ साली १५ लाख मतं मिळविणारी मनसे यावेळी ९ उमेदवार उभे करून देखील अवघ्या १.५ टक्के म्हणजे ६ लाख ९८ हजार मतांवर समाधान मानावे लागले आहे. शिवाय सगळ्यांचे डिपॉझिट देखील जप्त झाले ते वेगळेच. लोकसभेच्या निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही़ आपले मनसैनिक मोदींच्या पाठीशी उभे राहतील असे जर राज यांनी घोषित केले असते, तर या निकालानंतर ते हीरो ठरले असते; मात्र उमेदवार उभे करून ते झीरो ठरले.