काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले होते. यानंतर मराठा आंदोलनामुळे मुंबईतील वातावरण तापलेले होते. यावेळी राज यांनी गेल्यावेळच्या आरक्षणाचे काय झाले ते शिंदेंना विचारा असा रोकडा सवाल केला होता. आता मराठा आंदोलन संपल्यानंतर राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आणि गणपतीचे दर्शन घेतले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर आहे. अशातच शिंदे-फडणवीस यांच्या राज ठाकरेंसोबत भेटीगाठी वाढू लागल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. लोकसभेला राज ठाकरे यांनी थेट भाजपला पाठिंबा दर्शविला होता, तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांत सभाही लावल्या होत्या. आता हेच राज ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंसोबत जात आहेत. यातच या ना त्या कारणाने गाठीभेटी वाढल्याने राज ठाकरेंच्या एकत्र येण्यावर उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसे यांच्यातील युतीची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतू, स्थानिक पातळीवर एकत्र काम करण्याचे आदेश आहेत. तसेच निवडणुकीची तयारीही करण्याचे आदेश आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर या जुन्या सहकाऱ्यांनी एकमेकांसोबत मिळते-जुळते घेण्यात सुरुवात केली आहे. शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीवरून हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. राज आणि उद्धव ठाकरेंनी सभाही घेतली होती.