निवडणुकीत वाघाचा उंदीर करा - अमित शहांचा शिवसेनेला टोला
By Admin | Updated: October 9, 2014 13:01 IST2014-10-09T13:00:48+5:302014-10-09T13:01:14+5:30
ज्या उंदराला वाघ बनवले तोच उंदीर आता आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असून या वाघाला पुन्हा उंदीर करा असे आवाहन करत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

निवडणुकीत वाघाचा उंदीर करा - अमित शहांचा शिवसेनेला टोला
ऑनलाइन लोकमत
सिल्लोड, दि. ९ - ज्या उंदराला वाघ बनवले तोच उंदीर आता आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असून या वाघाला पुन्हा उंदीर करा असे आवाहन करत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेनेवर टीका न करण्याची भूमिका घेतली असली तरी शिवसेनेकडून वारंवार भाजपवर टीका होत आहे. अफजल खानाची फौज अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली होती. यापार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सिल्लोडमधील सभेत वाघ व उंदराची गोष्ट सांगत शिवसेनेला टोला लगावला आहे. अमित शहा म्हणाले, एका आश्रमातील उंदराने मांजराची भिती वाटत असल्याने ऋषींकडे मला मांजर करा असा वरदान मागितला. यानंतर त्याला कुत्र्यांची भिती वाटू लागल्याने कुत्रा व अखेरीस वाघाची भिती वाटू लागल्याने वाघ करण्याचा वरदानही त्याने मागितला. ऋषींनी त्यांची इच्छा पूर्ण केली. काही काळाने ऋषीमुनींसमोर एक वाघ उभा राहिला व त्याने ऋषींमुनींना खायची धमकी दिली. यानंतर ऋषीमुनींनी त्या वाघावर मंत्रोच्चार करत पाणी शिंपडले व तो वाघ शेवटी पुन्हा उंदीरच झाला.
अशाच पद्धतीने निवडणुकीतही वाघाचा उंदीर करा असे आवाहन अमित शहा यांनी कोणत्याही पक्षाचे नाव न घेता केले. अमित शहा यांचा हे आवाहन शिवसेनेला उद्देशून होते अशी चर्चा सभेनंतर रंगू लागली.