धरणक्षेत्राकडे पावसाची पाठ
By Admin | Updated: September 19, 2015 03:34 IST2015-09-19T03:34:40+5:302015-09-19T03:34:40+5:30
विदर्भासह मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला असतानाच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. परिणामी, तलावांतील

धरणक्षेत्राकडे पावसाची पाठ
मुंबई : विदर्भासह मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला असतानाच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. परिणामी, तलावांतील पाण्याची पातळी अद्यापही वाढत नसल्याने भविष्यात मुंबईतील २० टक्के पाणीकपात कायम राहणार असल्याचे चित्र आहे.
पावसाळा वगळता पुढील आठ महिने मुंबईला पुरेसा पाणीपुरवठा करायचा असेल तर १ आॅक्टोबर रोजी सातही तलावांत एकूण १४ लाख दशलक्ष लीटर्स पाणी असणे आवश्यक आहे. मात्र आता सप्टेंबर महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला तरी तलावातील पाण्याने १० लाख दशलक्ष लीटर्सचीही पातळी गाठलेली नाही. १८ सप्टेंबर रोजी सातही तलावांत एकूण ९ लाख ९४ हजार १५२ दशलक्ष लीटर्स पाण्याच्या पातळीची नोंद झाली आहे. हा जलसाठा १२ लाख दशलक्ष लीटर्स झाला तरी मुंबईकरांना भविष्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
परंतु राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असताना मागील २४ तासांत या तलाव क्षेत्रांत मात्र पावसाची नाममात्र नोंद झाली आहे. महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोडक सागर, तानसा, विहार, अपर वैतरणा आणि मध्य वैतरणा क्षेत्रात पावसाची नोंदच झालेली नाही; तर तुलसी तलाव क्षेत्रात २ मिलिमीटर आणि भातसा तलाव क्षेत्रात १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरातही केवळ ढग दाटून येत असून, पावसाने उघडीपच घेतली आहे. गेल्या २४ तासांत कुलाबा वेधशाळेत १.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. असे असले तरीही पुढील ४८ तासांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या वारंवार सरी कोसळतील; तर काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (प्रतिनिधी)