थंडीनंतर पावसाची चिन्हे!
By Admin | Updated: December 31, 2014 01:03 IST2014-12-31T01:03:52+5:302014-12-31T01:03:52+5:30
गत तीन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमुळे गारठलेल्या नागपूरकरांना पुढच्या काळात पावसापासून बचाव करावा लागणार आहे. बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे

थंडीनंतर पावसाची चिन्हे!
नागपूर तापमान: ७.१ अंश. से.
नागपूर : गत तीन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमुळे गारठलेल्या नागपूरकरांना पुढच्या काळात पावसापासून बचाव करावा लागणार आहे. बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नागपूरसह विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान सोमवारच्या तुलनेत मंगळवारी किमान तापमानात अंशत: वाढ झाल्याने थंडीची तीव्रता कमी झाली आहे.
गत काही दिवसांपासून तापमानात कमालीची घट झाल्याने नागपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भात थंडीची लाट आल्याने नागरिक यामुळे गारठून गेले आहेत. मंगळवारी त्यांना थंडीपासून थोडी उसंत मिळाली. सोमवारच्या तुलनेत किमान तापमानात २.१ अंशाने वाढ होऊन ते ७.१ अंश. से. वर स्थिरावले. पुढच्या २४ तासात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार बंगाल खाडीच्या दक्षिण-पश्चिम भागात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतातील हवामानात बदल अपेक्षित आहे. त्यानुसार पुढच्या ४८ तासात पाऊस पडू शकतो. मध्य प्रदेशातही जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
विमानसेवेलाही फटका
धुक्यामुळे विमान वाहतुकीला फटका बसू लागला आहे.मंगळवारी नागपूरहून दिल्ली व मुंबईकडे जाणाऱ्या विमानांसह नागपूर ते शारजहाला जाणाऱ्या विमानालाही गडद धुक्याचा फटका बसला. नागपूरहून शारजहाकडे जाणारे (फ्लाईट क्रमांक जी ९-४१६) विमान निर्धारित वेळेच्या एक तास उशिरा रवाना झाले. देशांतर्गत विमान वाहतुकींपैकी नागपूर-रायपूर, नागपूर -दिल्ली, नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई विमानांना एक तास उशीर झाला.