पावसाच्या सरीसंगे दिवेघाट पार
By Admin | Updated: July 2, 2016 04:16 IST2016-07-02T04:16:25+5:302016-07-02T04:16:25+5:30
नामघोषाच्या बळावर माऊलींनी आज अवघड दिवेघाटाची वाटचाल पूर्ण करीत सोपानकाकांच्या सासवडमध्ये मुक्कामाला आली.

पावसाच्या सरीसंगे दिवेघाट पार
बाळासाहेब बोचरे,
सासवड- ढगाळ वातावरणात सकाळपासूनची वाटचाल, घाट चालताना निघणाऱ्या घामाच्या धारा आणि वरून कोसळणारा वरुणराजाचा अभिषेक अशा आल्हाददायक पण आव्हानात्मक वातावरणात नामघोषाच्या बळावर माऊलींनी आज अवघड दिवेघाटाची वाटचाल पूर्ण करीत सोपानकाकांच्या सासवडमध्ये मुक्कामाला आली.
अवघ्या सोहळ्याला पावसाची चिंता असून भरून आलेले ढग पाहून वारकऱ्यांच्या पायात चालण्याची अधिक ऊर्मी येत होती़ पुणेकरांचा हृद निरोप घेऊन भल्या सकाळी दोन्ही पालख्या बाहेर पडल्या. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा ७ वाजता शिंदे छत्री भैरोबा नाका येथे तर ९़४५ वाजता हडपसर गाडीतळ येथे विसाव्याला आला़ त्यानंतर उरळी देवाची आणि रडकी नाला येथे विश्रांती घेऊन दुपारी २़३० वाजता सोहळा दिव्याचा घाट चढू लागला़ ढगाळ वातावरणात वाटचालीस पोषक वातावरण असले तरी वारकरी घामाघूम झाले होते़ त्यातच आलेल्या शिडकाव्याने दिलासा दिला आणि जल्लोषात वारकऱ्यांनी दिवेघाट पार केला़
घामाघूम झालेल्या वारकऱ्यांना बाबाराजे कोन्हापुरे यांंनी चहापाणी व नाश्त्याची सोय केली होती़ वाट पार करताच झेंडेवाडी येथे पुरंदर तालुक्याच्या सीमेवर पुरंदरवासीयांनी सोहळ््याचे जंगी स्वागत केले. येथे घटिकाभराच्या विश्रांतीनंतर निघालेला सोहळा सायंकाळी सासवड नगरीत दाखल झाला़ उद्या शनिवारी माऊलींचा सासवडमध्ये एक दिवस विसावा असून रविवारी पालखी जेजुरीक डे मार्गस्थ होणार आहे.
>...आणि बैलांची शोधाशोध
माऊलींच्या रथासाठी बॅटरी वापरली जात असल्याने गेली तीन वर्षे घाटातून चढण चढण्यासाठी बैलजोडीची गरज भासत नसे. परंतु यंदा तांत्रिक कारणाने बॅटरीचा रथ न आणता जुनाच रथ आणल्याने वडकीपासून पुन्हा बैलजोड्यांची जुळवाजुळव करावी लागली़ नियमित एका बैलजोडीसह आणखी पाच बैलजोड्या रथाला जुंपण्यात आल्या होत्या़
आज सोपान काकांचे सासवडहून प्रस्थान
सासवड ही संत ज्ञानेश्वर माऊलींचे बंधू संत सोपानकाका यांची नगरी. परंपरेप्रमाणे माऊलींची गळाभेट घेऊन सोपानकाकांची पालखी उद्या (शनिवारी) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे़
वारी चुकवू नये असे वाटते
वारी ही वारीच असते. वारी आली की मनाला हुरहूर लागते आणि त्यामध्ये सामील झाल्याशिवाय मन शांत राहत नाही़ सर्वांना मिसळून घेणारा हा सोहळा असल्याने गेली काही वर्षे मी या सोहळ्यात सहभागी होतो, असे वाकी शरीफ ताजुद्दीन बाबा दर्ग्याचे प्रमुख प्रभाकर डहाके (नागपूर) यांनी सांगितले़
तुकोबांचा पालखी सोहळा लोणी काळभोरला
लोणी काळभोर : पुणेकरांचा दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन तुकोबांची पालखी भल्या सकाळी मार्गस्थ झाली. सोहळ््याला निरोप देण्यासाठी हडपसरच्या सीमेपर्यंत दुतर्फा पुणेकरांनी गर्दी केली होती. सोहळा लोणी-काळभोर येथे मुक्कामी पोहोचला आहे. तेथील श्री विठ्ठल मंदिरांत समाजआरती झाली.