रिमझिम पावसात खेळिया रंगला रे!
By Admin | Updated: July 7, 2016 01:45 IST2016-07-07T01:45:25+5:302016-07-07T01:45:25+5:30
टाळ-मृदंगांचा गजर, मुखी ‘माऊली-माऊली’चा जयघोष, रोखलेला श्वास आणि अंगावर बरसणाऱ्या रिमझिम जलधारा अशा उत्कंठावर्धक व भक्तिमय वातावरणात वैष्णवांच्या मेळ्यातून माऊलींच्या

रिमझिम पावसात खेळिया रंगला रे!
- बाळासाहेब बोचरे, तरडगाव (सातारा)
टाळ-मृदंगांचा गजर, मुखी ‘माऊली-माऊली’चा जयघोष, रोखलेला श्वास आणि अंगावर बरसणाऱ्या रिमझिम जलधारा अशा उत्कंठावर्धक व भक्तिमय वातावरणात वैष्णवांच्या मेळ्यातून माऊलींच्या अश्वाने वेगाने धाव घेत चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण पूर्ण केले. त्यानंतर सारा आसमंत विठ्ठलनामाच्या जयघोषणात दुमदुमून गेला. हा नयनरम्य सोहळा लाखो भक्तांनी आपल्या डोळ्यांत साठविला.
केवळ एक दिवसाचा लोणंदचा मुक्काम संपवून दुपारी १ वाजता संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा तरडगावाकडे मार्गस्थ झला. आजच्या दिवसाचे आकर्षण म्हणजे चांदोबाचा लिंब येथे होणारे उभे रिंगण परिसरात पोलिसांनी चांगला बंदोबस्त लावला होता़ आजूबाजूच्या गावातील लोक मिळेल त्या वाहनाने हरीचा खेळ पाहण्यासाठी आले होते़ माऊलींची पालखी येण्यापूर्वीच रिमझिम पावसाने सडा टाकला होता़ त्यावर राजश्री जुन्नरकर तसेच पुण्याच्या समर्थ रंगावलीच्या कलाकारांनी रांगोळ्या काढल्या होत्या़ ३़३० वाजता रिंगणस्थळी अश्व आले़ ४ वाजता माऊलींचा रथ आला़ रामभाऊ चोपदार, उद्धव चोपदार, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार यांनी कौशल्याने रिंगण लावले. प्रचंड रेटारेटी असल्याने रिंगणाला मर्यादा आल्या होत्या़
पखवाज आणि टाळांचा खणखणाट चालू होता़ मुखातून ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड जयघोष सुरू होता़ अशा तल्लीन झालेल्या वातावरणात दोन्ही अश्वांना रिंगणात सोडून देताच अश्वांनी वाऱ्याच्या वेगाने दौडण्यास सुरुवात केली़ त्यावेळी अवघा आसमंत ‘माऊली माऊली’च्या आरोळ्यांनी दुमदुमून गेला होता़ मिनिटभराच्या या खेळाने लाखो नेत्र सुखावले़ त्यानंतर आरती करून बाळासाहेब चोपदारांनी दिंडीकऱ्यांना उडीच्या खेळास आमंत्रण दिले़ हरीच्या खेळाने आनंदित झालेल्या दिंड्या-दिंड्यांमध्ये विविध खेळ सुरू झाले़ नाचत-नाचतच हा सोहळा रात्री तरडगावच्या मुक्कामी गेला़ उद्या पालखी फलटण नगरीत मुक्कामी जाणार आहे़
अश्वाच्या धक्क्याने आरफळकर जखमी
अपुऱ्या जागेत लावलेल्या रिंगणात अश्वांना दौडण्यास पुरेशी जागा नव्हती़ त्यामुळे दौडताना मालक राजाभाऊ आरफळकर यांना अश्वाचा धक्का लागल्याने ते खाली पडले़ त्यांना तातडीने फलटणच्या रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यांची दुखापत गंभीर नसल्याचे सांगण्यात आले़