पावसाळी नियंत्रण कक्ष २४ तास
By Admin | Updated: June 4, 2015 08:42 IST2015-06-04T04:39:35+5:302015-06-04T08:42:59+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे पावसाळ्यातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी १ जूनपासून नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत

पावसाळी नियंत्रण कक्ष २४ तास
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे पावसाळ्यातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी १ जूनपासून नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या नियंत्रण कक्षांचे काम २४ तास सुरू राहणार असून, त्यासाठी पाच अधिकारी व ३० हून अधिक कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत.
एमएमआरडीएचे सह-प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी याबाबत सांगितले की, सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना सर्व कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रकल्पाच्या ठिकाणी बॅरिकेडिंग करणे, खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी करणे, रस्त्यावर जमा होणाऱ्या चिखलाची विल्हेवाट लावणे या सूचनांचा यामध्ये समावेश आहे. ज्या परिसरात सांडपाणी वाहून नेण्याची सोय नाही आणि ज्या ठिकाणी पाणी जास्त प्रमाणात साचण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी अतिरिक्त क्षमता असणारे पाण्याचे पंप उपलब्ध करून देण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.
पावसाळ्यादरम्यान झाडांची पडझड, पाणी साचणे, अपघात, वाहतूक कोंडी अशा विविध कारणांसाठी नियंत्रण कक्षाकडून मुंबईकरांना मदत मिळू शकते. अनपेक्षित घटना आणि धोका निर्माण होण्याच्या शक्यता याबाबत जनतेकडून माहिती मिळाल्यास त्याचे स्वागत करण्यात येईल. नियंत्रण कक्ष हा रेल्वे, मुंबई महापालिका, वाहतूक पोलीस, बेस्ट, अग्निशमन दल अशा विविध संस्थांशी सलग्न राहून कार्यरत
राहील. (प्रतिनिधी)