सहा एकर जमिनीवर पडणार्या पावसाच्या पाण्याचे होणार संकलन!
By Admin | Updated: January 1, 2017 01:27 IST2017-01-01T01:27:41+5:302017-01-01T01:27:41+5:30
श्री अंतरिक्ष श्वेतांबर जैन संस्थानचा उपक्रम; पाण्याचे शुद्धीकरण करून केल्या जाईल उपयोग

सहा एकर जमिनीवर पडणार्या पावसाच्या पाण्याचे होणार संकलन!
अरविंद गाभणे
मालेगाव (जि. वाशिम), दि. ३१- जैन समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र शिरपूर जैन येथील अंतरिक्ष श्वेतांबर जैन संस्थानच्यावतीने सहा एकर जागेमध्ये परसबाग उभारण्यात येत आहे. या परसबागेत पडणार्या पावसाच्या पाण्याचे संकलन केल्या जाणार आहे. तसेच संकलित करण्यात आलेल्या पाण्याच्या उपयोगाचेही नियोजन करण्यात आले आहे.
श्वेतांबर जैन मुनीश्री पन्न्यासप्रवर विमलहंस विजयजी महाराज व पन्न्यासप्रवर परमहंस विजयजी महाराज यांच्या मार्गदर्शनात श्री. अंतरिक्ष श्वेतांबर जैन संस्थानमध्ये बर्याच दिवसांपासून या परसबागेचे कार्य जोमाने चालू आहे. हजारो कामगारांच्या हस्ते परसबाग साकारल्या जात आहे. परसबागेमध्ये भक्तनिवास संकुल, प्रसादालयासह विविध बांधकाम सुरू आहेत. या परिसरात पडणार्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, याकरिता व्यवस्था केली आहे. जमिनीवर फरशी, टाइल्स बसविल्या असून, त्याचा उतार काढण्यात आला आहे. उताराच्या बाजूला नाल्या करण्यात आल्यात यामुळे पावसाचे पाणी परसबागेतील रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत जाणार आहे. हे पाणी या नालीच्या लगत असलेल्या झाडांना ड्रिपरच्या पाइपने सोडलेले आहे. झाडाला जर पाणी जास्त होत असेल, तर त्या पाइपांना बूच लावून बंद केल्यानंतर नालीतून जल संकलनासाठी तयार करण्यात आलेल्या ठिकाणी जाईल. जल संकलनासाठी दोन फूट रुंद व तीन फूट खोल व पाच हजार फूट लांब पक्की नाली बांधण्यात आली आहे. नालीच्या तळाला बेड टाकण्यात आले नाही. नालीत दगड टाकून ती भरण्यात आली आहे. यामुळे या नालीत पडणारे पाणी जमिनीत झिरपेल. तरीही पाण्याचे प्रमाण जास्त झाले, तर ते संकलित करण्यासाठी ४0 फूट आकाराचा व १५ फूट खोल खड्डा खोदून त्यामध्ये दगड व गिट्टी टाकण्यात येत आहे. यात साठलेले पाणी येथे बांधण्यात येत असलेल्या जलमंदिरात घेण्यात येणार आहे. तसेच भक्तिनिवासात असलेल्या स्नानगृहातही हे पाणी शुद्ध करून वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पाण्याचा प्रत्येक थेंब अन् थेंब वाहून न जाता तो भूगर्भात गेला पाहिजे, याकरिता हा वर्षाजल संकलनाचा उपक्रम राबविला आहे. विदर्भातील हा एकमव उपक्रम असावा, असे वाटते.
- दिनेश मुथा,
व्यवस्थापक, श्री. अंतरिक्ष श्वेतांबर जैन संस्थान, शिरपूर.
या वर्षाजल संकलनामुळे परसबागेजवळील विहिरी व कुपनलिका यांच्या भूजल पातळीत वाढ होणार आहे. जैन संस्थानने केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.
- विनायकराव देशमुख,
कार्याध्यक्ष, अखिल भारतीय नेहरू ब्रिगेड, वाशिम.