भुशी धरणावर पर्यटकांचा पाऊस

By Admin | Updated: July 11, 2016 00:39 IST2016-07-11T00:39:10+5:302016-07-11T00:39:10+5:30

वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी मुंबई व पुण्याहून हजारोंच्या संख्येने आलेल्या पर्यटकांच्या झिंगाट मस्तीने भुशी धरणावर अक्षरश: पाय ठेवण्यासाठी देखील जागा शिल्लक नव्हती.

Rainfall of tourists on Bhushi dam | भुशी धरणावर पर्यटकांचा पाऊस

भुशी धरणावर पर्यटकांचा पाऊस


लोणावळा : वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी मुंबई व पुण्याहून हजारोंच्या संख्येने आलेल्या पर्यटकांच्या झिंगाट मस्तीने भुशी धरणावर अक्षरश: पाय ठेवण्यासाठी देखील जागा शिल्लक नव्हती. काही सैराट पर्यटक धबधब्याच्या पाण्यात भिजण्यासाठी थेट डोंगरांवर उंच गेल्याने हिरवेगार डोंगर पर्यटकांनी रंगीबेरंगी झाले होते.
सकाळपासूनच शहरात पर्यटकांची गर्दी वाढल्याने दुपारी १२ लाच मुंबईहून येणाऱ्या वाहनांच्या लोणावळा शहरापासून खंडाळा बाह्यवळणापर्यंत वाहनांच्या तीनपदरी रांगा लागल्या होत्या, तर पुण्याहून येणाऱ्या वाहनांच्या दोन ते तीन पदरी रांगा लोणावळा चौकापासून वलवण गावापर्यंत गेल्या होत्या. दुपारी दोनला भुशी धरणापासून ते थेट लोणावळ्याच्या कुमार चौकापर्यंत वाहनांच्या रांगा आल्याने धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर अक्षरश: चालणेदेखील मुश्कील झाले होते. पर्यटकांची गर्दी व वाहतूककोंडी थोपविण्यासाठी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्यासह ११ पोलीस अधिकारी व ८० जवान वेगवेगळ्या मार्गांवर तैनात होते. तसेच वाहने पुढे घ्या, बाजूला घ्या, पर्यटकांनी घ्यावयाची काळजी आदींबाबत जागोजागी सूचना देण्यासाठी स्पीकर यंत्रणा बसविण्यात आली होती. पर्यटनस्थळांवर काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी लोणावळा धरणासमोरील धबधबा, भुशी धरण, लायन्स पॉइंट परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासह आयएनएस शिवाजीचे जवान व काही स्थानिक नागरिक वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करत होते.
मात्र वाहनांची संख्या तुफान असल्याने त्यावर नियत्रंण आणताना पोलीसदेखील हतबल झाले होते. जेवढे पर्यटक आज वाहनांनी लोणावळ्यात आले, त्याच्या दुप्पट, तिप्पट अधिक पर्यटक हे रेल्वे व इतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत आले होते. लोणावळा रेल्वे स्थानक ते भुशी धरणापर्यंत पायी चालणाऱ्या पर्यटकांची सकाळपासून तुफान गर्दी होती. लोणावळ्यात रात्रीपासून पाऊसदेखील जोरात सुरू असल्याने पर्यटकांनी वर्षाविहारासह धबधबे व धरणाच्या पायऱ्यावरून वाहणाऱ्या पाण्यात बसून भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. (वार्ताहर)

भुशी धरणावर पर्यटकांनी एकच गर्दी करत जल्लोष केल्याने आज धरणाच्या पायऱ्यावरून वाहणारे पाणी किंबहुना धरणाच्या पायऱ्यादेखील दिसत नव्हत्या. धरणाला जाळ्या लावण्यात आल्या असतानादेखील आगाऊपणा करत धरणात उतरण्याचा प्रयत्न काही युवा पर्यटक करीत होते. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्याने हुल्लडबाजांना चाप बसला. असे असले, तरी काही झिंगाट पर्यटक पायऱ्यांवर बिअरच्या बाटल्या घेऊन घोट जिरवत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
४धरणावर आलेली तरुणाई आज सैराट होऊन एकमेकाला आर्ची... परशा... या नावाने आवाज मारत झिंगाटच्या गाण्यावर नाचत होती. वाहतूककोंडीत देखील अनेक वाहनांमधून याच गाण्याच्या धून ऐकायला मिळत होत्या.
४लायन्स पॉइंट परिसरात आज मोठ्या प्रमाणात पाऊस व धुके होते. गरमा गरम वडापाव, चहा, मक्याची कणसे व मक्याची भजी, कांदा भजी खाणाऱ्यांची संख्यादेखील मोठी होती.

Web Title: Rainfall of tourists on Bhushi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.