पावसाने दाणादाण

By Admin | Updated: May 8, 2014 12:43 IST2014-05-08T12:43:53+5:302014-05-08T12:43:53+5:30

वीज कोसळून युवक ठार : महिला गंभीर; झाडे कोसळली, पत्रे उडाले

Rainfall thunders | पावसाने दाणादाण

पावसाने दाणादाण

 कणकवली : अवकाळी पावसाने आपले सत्र सुरूच ठेवले असून, आज (बुधवार) दुपारच्या सत्रात जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी पावसाने दाणादाण उडविली. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. काही मार्ग झाडे पडल्याने ठप्प झाले होते. वाहिन्या तुटल्याने वीजपुरवठाही बराच काळ खंडित राहिला. सावंतवाडी, नेतर्डे येथील सूर्यकांत नारायण परब (वय ३५) हा युवक वीज कोसळून ठार झाला. डोंगरपाल येथे काजू बागेत कामासाठी गेला असता पाऊस सुरू झाल्याने त्याने झाडाचा आडोसा घेतला आणि त्याचवेळी त्याच्यावर वीज कोसळली.

नाधवडेत झाड पडून रस्ता ठप्प

चक्रीवादळासह मुसळधार पाऊस झाल्याने शेकडो झाडे उन्मळून रस्ते, घरे व गोठ्यांवर पडली. आचिर्णे, खांबाळे, वाभवे, नापणे, कोकिसरे, नाधवडे, मांगवली, उंबर्डे, कुसूर, आदी गावांना सर्वाधिक फटका बसला. झाडे पडल्याने वीजवाहिन्या व दूरध्वनी केबल्स् तुटून मोठे नुकसान झाले आहे. शेकडो झाडे उन्मळून पडल्याने तळेरे-वैभववाडी मार्ग सुमारे दोन तासांहून अधिक काळ ठप्प होता. फोंडा आयटीआयनजीक मार्गावर वृक्ष उन्मळून पडल्याने तासभर कणकवली-फोंडा मार्ग ठप्प होता. कणकवली, कलमठ, वागदे परिसराला वादळी वार्‍याचा फटका बसला. रेडी येथे वीज कोसळल्याने महिला जखमी रेडी : रेडी- कनयाळे परिसराला विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने आज सायंकाळी झोडपले. अंगणात वाळत ठेवलेले कपडे काढण्यासाठी गेलेली तेथीलच सुलक्षणा किसन केदार ही महिला अंगावर वीज कोसळल्याने गंभीर जखमी झाली. ही घटना आज (बुधवार) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. सुलक्षणा केदार ही पाऊस आला म्हणून घराबाहेर वाळत ठेवलेले कपडे काढण्यासाठी बाहेर आली होती. याचवेळी विजेचा कडकडाट होऊन तिच्या अंगावर वीज कोसळली. शेजार्‍यांनी तिला त्वरित रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, आज रेडी परिसरात दुपारी साडेतीन वाजल्यापासून वीज खंडित झाली होती. त्यामुळे ग्रामस्थांसह व्यापारी वर्गाची मोठी गैरसोय झाली.

 

Web Title: Rainfall thunders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.