कोकणात पावसाच्या धारा गोठलेल्याच...
By Admin | Updated: August 23, 2015 00:29 IST2015-08-23T00:29:53+5:302015-08-23T00:29:53+5:30
राज्यात कोठेही पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोकणातल्या त्याच्या धारा मात्र कायम असतात, हे दरवर्षीचे चित्र यंदा बदलून गेले आहे. यंदा कोकणातही पावसाच्या धारा गोठल्या

कोकणात पावसाच्या धारा गोठलेल्याच...
रत्नागिरी : राज्यात कोठेही पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोकणातल्या त्याच्या धारा मात्र कायम असतात, हे दरवर्षीचे चित्र यंदा बदलून गेले आहे. यंदा कोकणातही पावसाच्या धारा गोठल्या असून, रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांतील सर्वांत कमी पाऊस यंदाच पडला आहे.
कोकणात जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचा हंगाम समजला जातो. या कालावधीत सरासरी ३५00 मिलिमीटर इतका पाऊस पडणे अपेक्षित धरले जाते. मृगाची सुरुवात जोरदार बरसण्याने होते. १ जून ते १५ जुलै या कालावधीत मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे या नक्षत्रात शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पाऊस अनियमित झाला आहे. गेल्या वर्षी रोहिणीच्या प्रारंभी पाऊस मुसळधार झाला परंतु, जून, जुलै, आॅगस्टही कोरडाच गेला. पावसाची सर्वच नक्षत्रे पावसाविना गेली. त्यानंतर आॅगस्टच्या अखेरीस पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली ती अगदी १५ सप्टेंबरपर्यंत. या महिन्यात झालेल्या पावसाने मग वर्षाचा कोटा पूर्ण केला होता. मात्र, या वर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे आगमन संथगतीने झाले आहे. गत पाच वर्षांच्या तुलनेने हे प्रमाण खूपच कमी आहे.
सन २0११ ते २0१५ या पाच वर्षांतील १ जून ते २१ आॅगस्ट या कालावधीतील सर्वाधिक पाऊस २0१३मध्ये (सरासरी ३६४0 मिलिमीटर) झाला आहे. मात्र, यंदा त्याच्यापेक्षा निम्म्याच, केवळ १७४५ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. गतवर्षी याच कालावधीत २२00 मिलिमीटर पाऊस झाला होता. हा पाऊस गेल्या १० वर्षांतील नीचांकी पाऊस होता. मात्र, या वर्षी गतवर्षापेक्षाही ४६५ मिलिमीटरने पाऊस अजूनही कमीच आहे.
कोकणात जून
ते सप्टेंबर पाऊस
सरासरी ३३६४ मिलिमीटर इतका पाऊस पडणे अपेक्षित.
गेल्या वर्षी रोहिणीच्या प्रारंभी पाऊस मुसळधार.
या वर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे आगमन संथगतीने.
गत पाच वर्षांच्या तुलनेने
हे प्रमाण खूपच कमी.
पावसाची सुरुवात वेळेत, मात्र प्रमाण कमीच. पाच वर्षातील १ जून ते २१ आॅगस्ट या कालावधीतील एकूण पाऊस (सरासरी मिलिमीटर)