रानभाज्या होऊ लागल्या नामशेष?
By Admin | Updated: July 1, 2016 03:54 IST2016-07-01T03:54:15+5:302016-07-01T03:54:15+5:30
पावसाळा सुरू झाला की खेडयापाडयात पूर्वीच्या काळात रानावनात उगवणाऱ्या रानभाज्याचा वापर पावसाळा संपेपर्यंत मोठया प्रमाणात करताना दिसत.

रानभाज्या होऊ लागल्या नामशेष?
शशिकांत ठाकूर,
कासा - पावसाळा सुरू झाला की खेडयापाडयात पूर्वीच्या काळात रानावनात उगवणाऱ्या रानभाज्याचा वापर पावसाळा संपेपर्यंत मोठया प्रमाणात करताना दिसत. रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने तसेच ग्रामिण भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने रानभाज्यांचा वापर आहारात सर्रास होत असे. मात्र, जंगलात लावले जाणारे वणवे, अमाप जंगलतोड व आधुनिक गृहीणींना या रानभाज्यांची पाककला माहीत नसल्याने सध्या त्यांचा होणारा कमी वापर यामुळे त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
पावसाळयात कंद भाज्यामध्ये कोन, करांदे, आळू, कणक, सुरण, मोहदूळे (मोहाची फळे) आदिंचा वापर आहारात करतात. यामुळे कडु कंदापासून वळी बनवतात. त्यांचा कडवटपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये राखाडी काही वेळ टाकून ठेवतात. तर फळभाज्यामध्ये सातपुते, करटोळी, कंटोळी, शिराळे, भोकर, अभई, गोमटी, वाघोटी, पेंढर, काकडं यांचा वापर होई. यामध्ये काकडांचा वापर लोत, धोधडी, शेवळी या पालेभाज्यांचा खाजरटपणा कमी करण्यासाठी करतात. तर पालेभाज्यामध्ये बाफळी, आळीम, शेवग्याचा पाला, शेवली, धोधडी, तेरा, आंबाडी, कोळी यात कोळी भाजीला विशेष महत्व आहे. आदिवासीत कोळीचा सण साजरा करतात.
>खाजरटपणा घालविणारी काकड
पावसाळा सुरू होताच काही दिवसातच रानावनात शेवळी ही रानभाजी मोठया प्रमाणात ठिकठिकाणी उगवते. त्याच्या भाजीला खाजरटपणा असल्याने त्यामध्ये काकड या वनस्पतीचे फळे वाटून टाकतात त्यामुळे भाजी चविष्ट बनते.
कोळी वनस्पती दोन प्रकाराची असते. कडू व मोहरी यापैकी मोहरी कोळीचा वापर भाजीसाठी करतात. बाफळीची फळे ही औषधी उपयोगासाठी वापरतात. तसेच बांबूचे नवीन येणारे कोंब त्यांना लहान लहान काप देऊन त्याची भाजी बनवितात. त्यास शिंद असे म्हणतात. त्याचा वापर पावसाळयात मोठया प्रमाणात भाजीमध्ये केला जातो. परंतू सद्यस्थितीत मात्र या रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.