पुढील आठवड्यात राज्यात पाऊस
By Admin | Updated: March 1, 2017 05:19 IST2017-03-01T05:19:22+5:302017-03-01T05:19:22+5:30
सध्या महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील हवामानातही मोठा बदल घडून येत आहे.

पुढील आठवड्यात राज्यात पाऊस
शेलपिंपळगाव (जि. पुणे) : सध्या महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील हवामानातही मोठा बदल घडून येत आहे. हवेचा दाब १००४ ते १००६ हेप्टा पास्कल इतका कमी होत आहे. परिणामी पुढील आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज जेष्ठ कृषी हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे.
साबळे म्हणाले, गेल्या आठ- दहा दिवसांपासून वातावरणात आमूलाग्र बदल जाणवत आहे. महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात हवेचा दाब कमी होत असल्याने जास्त हवेच्या दाबाकडील वारे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणणार आहेत. त्यामुळे ६ ते ८ मार्चदरम्यान विदर्भ, मराठवाडा पूर्व भाग, सोलापूर, दक्षिण महाराष्ट्राच्या पूर्व भागातील सांगली, सातारा, तर पुण्याच्या पूर्व भागात हवामान बदल घडून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. (प्रतिनिधी)