पावसाने संसार गेले वाहून
By Admin | Updated: August 5, 2016 00:46 IST2016-08-05T00:46:27+5:302016-08-05T00:46:27+5:30
दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर आलेला पाऊस पुणेकरांसाठी खूशखबर घेऊन आला.

पावसाने संसार गेले वाहून
पुणे : दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर आलेला पाऊस पुणेकरांसाठी खूशखबर घेऊन आला. धरणांतील पाणीसाठा वाढला. मुठामायही वाहू लागली. मात्र, पुण्यातील झेड ब्रिजखाली राहणाऱ्या भटक्या कष्टकरींचे संपूर्ण संसार निसर्गाच्या या तडाख्याने वाहून गेले. त्यांची रोजीरोटी असणारे फुगे आदी साहित्यही पाण्यात गेल्याने खायचे काय? ही परिस्थिती त्यांच्यासमोर असून, सुमारे १५० जणांवर उपासमारीची वेळ आली आहे.
झेड ब्रिज परिसरात सुमारे ३० कुटुंबे राहतात. शासनाकडून त्यांना आधारकार्ड, रेशनकार्ड अशा सुविधाही मिळाल्या आहेत. मात्र, महापालिकेच्या लेखी त्यांची नोंदच नाही. त्यामुळे मंगळवारी नदीला येणाऱ्या पुराचा इशारा देण्याची यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही. कचरा व प्लॅस्टिक गोळा करणाऱ्या, धुणी-भांडी करून आपले पोट भरणाऱ्या महिला येथे आहेत. पुरुष फुगे आदी साहित्य विकतात. घराचा आडोसा म्हणजे प्लॅस्टिकचा कागद, गंजलेल्या पत्र्यांचा आडोसा किंवा लाकडी फळ््या. मात्र, तरीही हे घर आहे आणि सगळा संसारच त्यामध्ये आहे.
लहू काळे यांनी दोन मुलींसह घरात पाणी शिरल्याने डेक्कनच्या पीएमटी शेडमध्ये आडोश्यासाठी धाव घेतली. कपडे, घरातील भांडी, अन्नधान्य मुलांची वह्या-पुस्तके असं सगळं वाहून गेलं होतं. आता दोन वेळचं जेवण मिळणंही मुश्किल झालं आहे, असे प्रदीप काळे यांनी सांगितले. सुमनबार्इंना तर हे सगळं सांगताना अश्रू आवरत नव्हते.
>गेली तेरा वर्षे आम्ही झेड ब्रिजच्या खाली राहतो. आधारकार्ड, रेशनिंगकार्ड, बँक पुस्तकावर आमचा येथे राहण्याचा पत्ता आहे. प्रत्येक निवडणुकांच्या काळात नगरपालिकेकडून आम्हाला राहण्यासाठी घर देण्याचे आश्वासन दिले जाते. परंतु अद्याप काहीच हालचाल झालेली नाही. आमची कागदपत्रे खोटी असल्याचा आरोप केला जात आहे.
- अब्बाराव काळे( फुगे व्यावसायिक)
दोन वर्षांपूर्वी माझे सिलिंडरच्या स्फोटात दोन्ही डोळे गेले. तसेच पोटाला, हाताला जखमा झाल्या. नदीच्या पाण्यात माझा सर्व संसार वाहून गेला आहे. माझी चार मुले, म्हातारे आई-वडील या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. - छोटू काळे