रेल्वेवर ‘रेन’ब्लॉक
By Admin | Updated: August 1, 2016 04:33 IST2016-08-01T04:33:17+5:302016-08-01T04:33:17+5:30
गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसाने रविवारी चांगलाच जोर पकडला आणि त्याचा फटका रेल्वे, रस्ते वाहतुकीला बसला.

रेल्वेवर ‘रेन’ब्लॉक
मुंबई : गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसाने रविवारी चांगलाच जोर पकडला आणि त्याचा फटका रेल्वे, रस्ते वाहतुकीला बसला. रेल्वेच्या तीन्ही मार्गांपैकी मध्य रेल्वे आणि हार्बरवरील काही स्थानकांवर पाणी साचल्याने लोकल विस्कळीत झाल्या. यात दिवा स्थानकाजवळील पारसिक बोगद्याजवळ रुळ पाण्याखाली गेल्याने त्याचा परिणाम लोकल सेवांवर झाला आणि जवळपास २२ लोकल फेऱ्या रद्द् करण्यात आल्या. पावसामुळे उपनगरीय रेल्वे मार्गांवरील तीन्ही सेवा १०-१५मिनिटे उशिराने धावत होत्या. तर अनेक ठिकाणी साचलेले पाणी व असलेले खड्डेयामुळे रस्ते वाहतूकही मंदावली.
रविवारी पहाटेपासून मुंबई शहर व उपनगरात मुसळधार पाऊस सुरु झाला. पावसाने चांगलाच जोर पकडल्याने त्याचा पहिला फटका उपनगरीय रेल्वे सेवेला बसला. मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि ठाणे, कळवा स्थानकातील रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने अप तसेच डाऊन मार्गांवरील लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावू लागल्या. यात आणखी एक भर पडली ती दिवा पारसिक बोगद्याजवळील घटनेची. सकाळी ११.५0 च्या सुमारास दिवा पारसिक बोगद्याजवळील रुळांवर पाण्यासह मोठ्या प्रमाणात मातीही साचली. त्यामुळे दुपारी सव्वा एक वाजेपर्यंत दिवा आणि ठाणे दरम्यानची अप, डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. कळवा, ठाणे येथे ट्रॅकवर पाणी साचल्याने धीम्या मार्गांवरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली. मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉकच रद्द करण्यात आला. मध्य रेल्वेवर दिवसभरात २२ लोकल फेऱ्या रद्द करतानाच ३२ फेऱ्या अंशत: रद्द करण्यात आल्या. हार्बर मार्गावरील वडाळा स्थानकात पाणी साचल्याने या मार्गावरील लोकल सेवांवरही परिणाम झाला. पश्चिम रेल्वेचा वेग मंदावला आणि या मार्गांवरील लोकलही पंधरा मिनिटे उशिराने धावू लागल्या. (प्रतिनिधी)
>अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याचा व खड्ड्यांचा सामना वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरुन धावणाऱ्या वाहनांना करावा लागत होता. बोरीवली, कांदिवली, अंधेरी येथून वान्द्रे येथे येईपर्यंत तब्बल दोन ते अडीच तास वाहन चालकांना लागत होते. सायन, चेंबूर, घाटकोपर मार्गे प्रवास करतानाही अशाच परिस्थितीला प्रवाशांना सामोरे जावे लागले. वाहतूक कोंडी आणि खड्ड्यातून मार्ग काढत वाहनांना पुढे सरकवण्यासाठी अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांची कसोटी लागत होती.