सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वे सेवा कोलमडली
By Admin | Updated: July 21, 2016 18:40 IST2016-07-21T18:40:26+5:302016-07-21T18:40:26+5:30
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे सेवा गुरूवारी सकाळी विस्कळीत झाली . सकाळी साडे सहा पासून ही सिग्नल यंत्रणा बारा वाजे पर्यंत तब्बल चार वेळा बंद पडली

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वे सेवा कोलमडली
पुणे : सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे सेवा गुरूवारी सकाळी विस्कळीत झाली . सकाळी साडे सहा पासून ही सिग्नल यंत्रणा बारा वाजे पर्यंत तब्बल चार वेळा बंद पडली. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे आणि सोलापूरकडे जाणा-या तसेच मुंबईहून पुण्याकडे येणा-या तब्बल 28 गाडया एक ते दिड तास उशीराने धावत होत्या. तर लोणावणा-पुणे मार्गावरील दोन लोकलही रद्द करण्यात आल्या. या बिघाडाचा सर्वाधिक फटका चाकरमान्यांना बसला असून लोणावळयाकडे जाणारी एक लोकल आणि डेक्कन क्वीन तसेच प्रगती एक्सप्रेस तब्बल तासभर उशीराने मुंबईकडे रवाना झाली. त्यामुळे या गाडया मुंबईतही उशीरा पोहचल्या. दरम्या, सकाळ सकाळ हा प्रकार घडल्याने रेल्वे स्थानकवार मोठी गर्दी झाली होती. त्यातच स्थानकावर गाडया थांबविण्यासाठी जागा नसल्याने तसेच प्रवाशांचा होत असलेला खोळंबा लक्षात घेऊन पारंपारीक पध्दतीने कर्मचा-यांच्या
यंत्रणेद्वारे यातील काही गाडया धोका पत्करून रेल्वे प्रशासनाकडून मुंबईकडे रवाना करण्यात आल्या.
सकाळी सहा वाजून 5 मिनिटांनी आपल्या नियमित वेळेनुसार, सिंहगड एक्सप्रेस मुंबईकडे रवाना झाल्यानंतर साडेसहा वाजता तळेगाव लोकलही रवाना झाली. ही गाडी पुढे जाताच काही क्षणाताच मुंबई तसेच सोलापूरकडे जाणारी संपूर्ण सिग्नल यंत्रणाच बंद पडली. त्यामुळे स्थानकावर अचानक सर्वच गाडया थांबविण्यात आल्या. त्यानंतर लगेच 6.50 मिनिटांनी लोणावळयाकडे जाणारी लोकल रद्द करण्यात आली. त्यानंतर कोल्हापूरहून आलेली सह्याद्री एक्सप्रेसही काही वेळ थांबविण्यात आली. त्यामुळे प्रवाशांमध्ये काहीवेळ गोंधळाची स्थिती होती. त्यानंतर लगेचच 7 वाजून 15 मिनिटांनी जाणारी डेक्कन क्वीन, 7.10 मिनिटांनी सुटणारी बारामती पँसेंजर, 7 वाजून 50 मिनिटांनी सुटणारी प्रगती एक्सप्रेसही थांबविण्यात आली. या गाडयांना प्रामुख्याने मुंबईकडे जाणा-या नोकदरांची मोठी गर्दी असते.
त्यामुळे स्थानकावर प्रचंड गर्दी झाल्याने काही काळ गोंधळही निर्माण झाला होता. दरम्यान, सिग्नल यंत्रणेच्या बिघाडाची माहिती देत प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहनही करण़्यात आले. मात्र, त्याच गाडयांना जास्त उशीर झाल्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन काही गाडया मँन्यूअली सिग्नल यंत्रणेद्वारे सोडण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
===========================
28 गाडयांना उशीर 2 लोकल रद्द
सिग्नल यंत्रणेमधील या बिघाडाचा फटका पुणे रेल्वेस्थानकावरून जाणा-या तब्बल 28 गाडयांना बसला, त्यात प्रामुख्याने 2 लोकल, 2 पँसेंजर तसेच 22 एक्सप्रेसचा समावेश होता. यात प्रामुख्याने पुण्याहून सुटणा-या प्रगती, डेक्कन क्वीन, कामाख्या एक्सप्रेस, हजरत निजामुददीन, चेन्नई सेंट्रल , विशाखा पटटनम, गोरखपूर, भुवनेश्वर, हातीया या गाडयांनाही उशीर झाला. तर पुण्यामार्गे मुंबईकडे जाणा-या तसेच मुंबईहून पुण्याकडे येणा-या गाडयांमध्ये काकीनाडा एक्सप्रेस, यशवंतपूर, सिंकदराबाद, हैद्राबाद, कोईमंबतूर या गाडयांनाही 40 ते 45 मिनिटांचा उशीर झाला.