रेल्वे पोलिसांचा अतिथी देवो भव:
By Admin | Updated: July 31, 2016 02:15 IST2016-07-31T02:15:22+5:302016-07-31T02:15:22+5:30
विदेशी वृद्ध महिलेची हरवलेली पर्स रेल्वे पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत शोधून काढली आहे.

रेल्वे पोलिसांचा अतिथी देवो भव:
नवी मुंबई : विदेशी वृद्ध महिलेची हरवलेली पर्स रेल्वे पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत शोधून काढली आहे. त्यामध्ये दीड लाख रुपये व पासपोर्ट तसेच इतर महत्त्वाचे दस्तऐवज होते. घाईमध्ये रेल्वेतून उतरताना ही महिला पर्स विसरून गेली होती.
शुक्रवारी सकाळच्या सुमारास रबाळे रेल्वे स्थानकातील हा प्रकार आहे. मूळची मध्य प्रदेशची, परंतु विवाहानंतर यूके येथे स्थायिक झालेल्या निता ठाकूर-वर्मा (५४) यांच्याबाबत ही घटना घडली. ६ जुलै रोजी त्या भारतात काही कामानिमित्त आलेल्या आहेत. शुक्रवारी सकाळी ठाणे येथून त्यांनी ऐरोलीला येण्यासाठी नेरूळ लोकलमधून प्रवासाला सुरुवात केलेली. परंतु झोप लागल्यामुळे ऐरोली स्थानक गेल्यानंतर रबाळे स्थानकात त्यांना जाग आली. यावेळी घाईमध्ये उतरण्याच्या प्रयत्नात त्या सोबतची पर्स रेल्वेतच विसरल्या होत्या. ही बाब त्यांच्या निदर्शनास आली, तोपर्यंत रेल्वे स्थानकाबाहेर गेलेली होती. यामुळे त्यांनी तत्काळ रेल्वेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्यास सुरुवात केली. याचदरम्यान रेल्वेतील महिलांना वर्मा यांची विसरलेली पर्स नजरेस पडली. त्यांनी फलाटावर उभ्या असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्याला ही बाब सांगितली. मात्र तो कर्मचारी त्यांच्यापर्यंत पोचण्यापूर्वीच रेल्वे सुरू झाली. मात्र त्याने सदर पर्सची माहिती तुर्भे आरपीएफला दिली. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे साहाय्यक निरीक्षक घनश्याम सिंग व गोविंद कुमार यांनी ती पर्स ताब्यात घेतली. झडतीमध्ये त्या पर्समध्ये नोटांचे बंडल, पासपोर्ट तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे आढळून आली. परंतु अनेक प्रयत्न करूनही पोलिसांना निता शर्मा यांच्याशी संपर्क साधता येत नव्हता.
अखेर पर्समधील काही कागदपत्रांच्या आधारे अनेकांशी संपर्क साधून त्यांचा मोबाइल नंबर मिळवल्याचे आरपीएफचे निरीक्षक लोकेश सागर यांनी सांगितले. नेरूळच्या दिशेने जाणाऱ्या एका रेल्वेत त्या पोलिसांच्या नजरेस देखील पडल्या. परंतु ज्या विदेशी महिलेची पर्स आहे, त्या याच का हे पोलिसांना माहीत नव्हते. सुमारे एका तासाने निता यांचा फोनवर संपर्क झाला, त्यावेळी त्या पर्सच्या शोधात नेरूळ स्थानकात पोचल्या होत्या. (प्रतिनिधी)
तुर्भे आरपीएफ कार्यालयात त्यांना पर्स ताब्यात दिली असता पर्समध्ये १ लाख ३५ हजार रुपयांसह महत्त्वाची कागदपत्रे मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. घर खरेदीच्या प्रयत्नात त्यांनी ही रक्कम सोबत बाळगली होती. यामुळे भेट म्हणून त्यांनी पोलिसांना काही रक्कम देण्याचा प्रयत्न केला. परंतु रेल्वे पोलिसांनी पैसे नाकारत त्यांच्या समाधानातच धन्यता मानली.