लोकल खोळंब्याविषयी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मात्र गप्प!

By Admin | Updated: November 19, 2014 05:11 IST2014-11-19T05:11:15+5:302014-11-19T05:11:15+5:30

गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेचा काहीना काही कारणास्तव बोऱ्या वाजत असून त्याचा लाखो प्रवाशांना मनस्ताप होत आहे. हा त्रास दूर करण्याचे आश्वासन

Railway Minister Suresh Prabhu is silent about the locals' inability! | लोकल खोळंब्याविषयी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मात्र गप्प!

लोकल खोळंब्याविषयी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मात्र गप्प!

सुशांत मोरे, मुंबई
गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेचा काहीना काही कारणास्तव बोऱ्या वाजत असून त्याचा लाखो प्रवाशांना मनस्ताप होत आहे. हा त्रास दूर करण्याचे आश्वासन देऊनही तो दूर होताना दिसत नाही. याबाबत नवे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनाही गांभीर्य नसल्याचेच दिसून आले आहे. मुंबईच्या उपनगरीय लोकलमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांची मनस्तापातून कधी सुटका होईल, याविषयी रेल्वेमंत्र्यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र सातत्याने विचारूनही त्यांनी अन्य विषयावरच बोलणे पसंत केले.
मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरून दररोज ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र या प्रवाशांना दररोज अनेक कारणाने मनस्तापाला सामोरे जावे लागते. मध्य रेल्वेच्या मेन लाइनचा वक्तशीरपणा बिघडल्याचे दिसून येते. ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेत बिघाड होणे, रुळांत आणि लोकलमध्ये बिघाड होणे अशा अनेक कारणांमुळे सध्या मध्य रेल्वे प्रवाशांचा प्रवास रखडतरखडत सुरू आहे. ही समस्या सोडवण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारबरोबरच शनिवारीही मेगाब्लॉक घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कामकाजादिवशी प्रवाशांना डबल मनस्ताप होतो. निधीअभावी देखभाल आणि दुरुस्तीचा प्रश्न सतावत असल्याचेही रेल्वेकडून सांगण्यात आले. म्हणूनच ९0 कोटी रुपयांची मागणी नुकतीच रेल्वेकडून रेल्वेमंत्रालयाकडे करण्यात आली होती. त्यावर ६0 कोटी रुपये देण्यावर रेल्वेकडून विचार सुरू आहे. याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आपण रेल्वेसाठी पोर्टल तयार करण्यावर भर देत असल्याचे सांगितले. मात्र सध्या मुंबईतील लोकल सेवेला तांत्रिक समस्या सतावत असून त्या नक्की कधी सुटतील आणि प्रवाशांना दिलासा मिळेल का, तसेच तयार करण्यात येणारे पोर्टल कुणासाठी, असे विचारूनही फक्त पोर्टलविषयीच बोलत ते संपूर्ण रेल्वेसाठी असणार असल्याचे सांगितले. मुंबईतील उपनगरीय लोकल प्रवाशांना होणाऱ्या मनस्तापाबद्दल पुन्हा एकदा विचारले असता, मी बैठकीत आहे, असे सांगून त्यांनी फोन ठेवून दिला.

Web Title: Railway Minister Suresh Prabhu is silent about the locals' inability!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.