जिल्ह्यात छापे; ३७ सिलिंडर जप्त
By Admin | Updated: May 8, 2014 12:34 IST2014-05-08T12:34:02+5:302014-05-08T12:34:02+5:30
प्रशासनाची मोहीम : ६६ जणांवर गुन्हे दाखल, स्फोटांच्या पार्श्वभूमीवर दक्षतेचे उपाय

जिल्ह्यात छापे; ३७ सिलिंडर जप्त
सांगली : जिल्हा प्रशासनाने आजच्या (बुधवार) दुसर्या दिवशीही मोहीम राबवून जिल्ह्यातील १२२ ठिकाणी छापे टाकून ३७ घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले. काल १२८ ठिकाणी छापे टाकून ७३ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. आज याप्रकरणी ६० जणांवर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. सांगलीत झालेल्या स्फोटामध्ये ७ जणांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गेल्या दोन दिवसांपासून घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणार्या ठिकाणी छापासत्र अवलंबले आहे. आजच्या दुसर्यादिवशी हॉटेल, ढाबे, खानावळी, टपर्या, लॉज आदी ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये अन्नधान्य वितरण अधिकारी, पुरवठा विभागाचे निरीक्षक आदींनी सहभाग घेतला. आज दिवसभरात १२२ ठिकाणी छापे टाकून ३७ सिलिंडर जप्त करण्यात आले. यामध्ये जत तालुक्यात ५० ठिकाणी छापे टाकण्यात आले. येथे २१ सिलिंडर जप्त करण्यात आले. वाळवा तालुक्यात ३९ ठिकाणी छापे टाकण्यात येऊन १८ सिलिंडर जप्त करण्यात आले. मिरज तालुक्यात ३० ठिकाणी छापे टाकण्यात आले, तेथे ४ सिलिंडर जप्त करण्यात आले. कडेगाव तालुक्यात ३ ठिकाणी छापे टाकून १ सिलिंडर जप्त करण्यात आले. काल १२८ ठिकाणी छापे टाकून ७३ सिलिंडर जप्त करण्यात आले. याप्रकरणी आज जिल्हाभरातील पोलीस ठाण्यात ६० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.