पेडणेजवळ रेल्वेवर दरोडा

By Admin | Updated: January 20, 2015 23:49 IST2015-01-20T23:10:26+5:302015-01-20T23:49:28+5:30

पाच प्रवाशी जखमी : ४८ हजारांचा मुद्देमाल लुटला; झारापजवळ तिघांना पकडले

Raid on the railway near Peden | पेडणेजवळ रेल्वेवर दरोडा

पेडणेजवळ रेल्वेवर दरोडा

कुडाळ : मंगलोरहून मुंबईकडे जाणाऱ्या त्रिवेंद्रम-वेरावल रेल्वेवर पेडणे-गोव्याच्या दरम्यान आज, मंगळवारी दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यादरम्यान, रेल्वेतील पाचजणांवर चाकूचे वार करून सुमारे ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लुटून पळून जात असताना चार दरोडेखोरांपैकी तिघांना प्रवासी व झाराप ग्रामस्थांच्या मदतीमुळे पकडण्यात यश आले. मात्र, एक दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्याचा कुडाळ पोलीस शोध घेत आहेत. दरोडेखोरांचे कनेक्शन गोवा-मडगाव येथे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मंगलोर येथून आज पहाटे पाच वाजता सुटणारी ही रेल्वे दुपारी १.१५ वाजता झाराप येथे पोहोचली. झाराप स्थानकावर क्रॉसिंगसाठी ती थांबविण्यात आली होती. यावेळी इंजिनकडून पहिल्या डब्यातून ‘चोर चोर... पकडा पकडा...’ असा आरडाओरडा ऐकू आला. जनरल डब्यातून चार दरोडेखोर प्रवाशांकडील पैसे आणि इतर साहित्य लुटून पळण्याच्या प्रयत्नात होते. काहीजणांनी त्या चौघांपैकी एकाला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती कुडाळ पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सतीश निकम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पळालेल्या तिघांपैकी एका दरोडेखोरास ग्रामस्थांच्या मदतीने नजीकच्या जंगल भागातून जेरबंद केले. दरोडेखोरांनी पेडणे-गोवा स्थानकादरम्यान चाकू आणि चॉपरचा धाक दाखवून जनरल डब्यातील सर्व प्रवाशांकडील सुमारे ३० हजार रुपयांची रोकड, मोबाईल, घड्याळे मिळून सुमारे ४७ हजारांचा मुद्देमाल लुटला. याला विरोध करणाऱ्या चार ते पाच प्रवाशांवर चाकू आणि ब्लेडचे वार करून जखमी केले, अशी तक्रार या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या गोस्वामी सोनगिरी (वय २५, रा. जुनागढ-गुजरात) याने कुडाळ पोलिसांत दिली. आपल्याबरोबर असलेल्या फैजल असैन राकुट्टी, अब्दुल अजिमल नालकथ, हजमाकोया नालकथ (सर्व रा. केरळ) यांच्याकडील रोकड आणि मोबाईल काढून घेतल्याची माहितीही त्याने दिली. ही गाडी सावंतवाडी-झाराप येथील स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबणार असल्याची माहिती दरोडेखोरांकडे असल्याने त्यांनी आधीच नियोजन करून हा दरोडा घातल्याची शक्यता आहे. मंगलोर एक्स्प्रेसमध्ये दरोडा घालणाऱ्यांना झाराप येथे प्रवासी व ग्रामस्थांनी पकडल्यानंतर एक आरोपी फरार झाला. त्याच्या शोधार्थ जिल्ह्यातील पोलीस कुडाळ तसेच झाराप सावंतवाडी परिसरात रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. (प्रतिनिधी)
सर्व दरोडेखोर कर्नाटकचे
आप्पासाहेब हनुमंत निकम (वय २७, रा. तुंगळ जमखडी, बागलकोट), रविल स. गौडा (रा. रामनगर, बिडदी, जि. बंगलोर), विजय रमेश मिरजकर (रा. नवनगर, बागलकोट), अशी अटक केलेल्या तीन दरोडेखोरांची नावे आहेत. फरार झालेल्या दरोडेखोराचे नाव अशोक, असे असून तो मडगाव रेल्वेस्थानकानजीक राहतो, अशी माहिती मिळाली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेले हे चारही दरोडेखोर मडगाव येथेच रेल्वेत चढले असावेत व त्यांचे लोकेशन मडगाव येथेच असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
दरोड्याचा घटनाक्रम
पेडण्यापासून धाक दाखवून प्रवाशांना लुटण्यास प्रारंभ
चाकू आणि ब्लेडचा धाक
काहीजणांचे गळेही दाबले
दुपारी १.३० वाजता रेल्वे झाराप येथे रेल्वे क्रॉसिंगसाठी थांंबली असताना दरोडेखोरांचा पळण्याचा प्रयत्न.
एकाला प्रवाशांनी पकडले
दोघांना नजीकच्या जंगलभागातून ताब्यात घेतले.

Web Title: Raid on the railway near Peden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.