राहुल- शीनाच्या प्रेमाबाबत होती नाराजी

By Admin | Updated: July 20, 2016 06:06 IST2016-07-20T06:06:03+5:302016-07-20T06:06:03+5:30

पीटर व इंद्राणी राहुल आणि शीनाच्या प्रेमसंबंधाबाबत नाराज होते.

Rahul was angry about the love of love | राहुल- शीनाच्या प्रेमाबाबत होती नाराजी

राहुल- शीनाच्या प्रेमाबाबत होती नाराजी


मुंबई : पीटर व इंद्राणी राहुल आणि शीनाच्या प्रेमसंबंधाबाबत नाराज होते. या नाराजीमुळेच पीटर आणि इंद्राणीने शीनाच्या हत्येचा कट रचला, अशी माहिती सीबीआयने मंगळवारी उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे दिली.
पीटरने जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जाला सीबीआयने विरोध केला आहे. या हत्याप्रकरणाचा तपास अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे, अशा वेळी पीटरची जामिनावर सुटका करण्यात आली, तर तपासाला हानी पोहोचेल, असे सीबीआयने न्या. पी. एन. देशमुख यांना सांगितले.
‘पीटर व अन्य आरोपींनी थंड डोक्याने या हत्येचा कट रचला. पीटर आणि इंद्राणी दोघेही राहुल- शीनाच्या प्रेमसंबंधाबाबत खुश नव्हते,’ असे सीबीआयने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सीबीआयने न्या. देशमुख यांच्यापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले. न्या. देशमुख यांनी या अर्जावरील पुढील सुनावणी २७ जुलै रोजी ठेवली आहे.
पीटरने म्हटले आहे की, पुरावे नसताना संशयाच्या जोरावर त्याला कारागृहात खितपत ठेवले आहे. सीबीआयने त्याचा दावा फेटाळला. शीना आणि राहुलच्या प्रेमसंबंधाला इंद्राणीप्रमाणेच पीटरचाही आक्षेप होता, असा दावा सीबीआयने न्यायालयापुढे केला आहे. त्यासाठी सीबीआयने राहुलच्या काही ई-मेल्सचा आधार घेतला आहे. (प्रतिनिधी)
>पीटरचाही होता विरोध
२८ मे २०१२ रोजी राहुलने पीटरला मेल पाठवाला. या मेलमध्ये राहुलने शीना आणि त्याला वेगळे करण्यास पीटरला जबाबदार धरले होते.
पीटरने शीनाला ३ एप्रिल २०११ रोजी पाठवलेला मेलही सीबीआयने न्यायालयाच्या निदर्शनास आणला आहे. या मेलमध्ये पीटरने शीनाला लिहिले आहे की, राहुलने स्वतंत्रपणे कमवावे आणि सभ्यपणे जगावे. मात्र, त्याऐवजी तो प्रेमात पडला.
‘पीटरने एकदा त्याच्या मित्रालाही शीना आणि राहुलमधील नाते ‘योग्य’ नसल्याचे सांगितले,’ असेही सीबीआयने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
या सर्व पुराव्यांवरून पीटरही शीना आणि राहुलच्या नात्याबाबत खुश नव्हता, हे सिद्ध होते आणि त्यामुळे तोही हत्येच्या कटात सहभागी झाला, असेही तपासयंत्रणेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Web Title: Rahul was angry about the love of love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.