राहुरी कृषी विद्यापीठातील चारा प्रकल्प करपला
By Admin | Updated: June 6, 2016 23:51 IST2016-06-06T23:44:31+5:302016-06-06T23:51:58+5:30
अण्णा नवथर ल्ल अहमदनगर महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सरकारी चारा प्रकल्पातील मका, ज्वारी यंदा पूर्णपणे करपली आहे़विशेष म्हणजे प्रकल्पासाठी दोनशे टीएमसी पाणी

राहुरी कृषी विद्यापीठातील चारा प्रकल्प करपला
अण्णा नवथर ल्ल अहमदनगर
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सरकारी चारा प्रकल्पातील मका, ज्वारी यंदा पूर्णपणे करपली आहे़विशेष म्हणजे प्रकल्पासाठी दोनशे टीएमसी पाणी राखीव ठेवून आणि निधी देऊनही मक्याची वाढ केवळ दीड फुटापर्यंत झाली असून दोन एकरात केवळ ट्रकभर चारा निघत आहे.
जिल्ह्णातील पशुधन वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी चारा प्रकल्प राबविण्याचे ठरविले़ त्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाची निवड केली़ विद्यापीठातील ३०० एकरवर मका व ज्वारीची पेरणी करण्यात आली़ वार्षिक योजनेतून ४० लाख रुपयांची तरतूद प्रकल्पासाठी करण्यात आली. त्याचबरोबर मुळा धरणात २०० टीएमसी पाणी प्रकल्पासाठी राखीव ठेवले़ दोन महिन्यांनी जूनच्या एक तारखेला चारा काढणी सुरू झाली आहे़ छावण्या चालकांना दोन हजार रुपये टनाप्रमाणे चारा दिला जात आहे़ मात्र तेथील मक्याचे पीक पाहून छावणी चालकांनीही डोक्याला हात लावला़
विद्यापीठापेक्षा शेतकऱ्यांचा चारा परवडला, अशी भावना छावणी चालकांची झाली आहे़ कमी वाढ आणि विरळ पीक यामुळे एक एकरात चार टन इतका मका निघतो़ दिवसभराच्या काढणीनंतर पाच टनाचे वाहनही भरत नाही़ त्यामुळे हा चारा छावणी चालकांना परवडत नसल्याचे चित्र आहे. मात्र जिल्ह्णात कुठेही चारा उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव हा चारा छावणी चालकांना घ्यावा लागत आहे.
01 विद्यापीठात साधारण एका एकरात चार ते पाच टन चारा मिळतो़ काही ठिकाणी तर यापेक्षा कमी वजन भरते़ दोन एकरात १० टनाची ट्रक भरते़ ही ट्रक भरण्यासाठी किमान दोन दिवस लागतात़ त्यामुळे छावणी चालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे़
02मकाला पुरेसे पाणी मिळाल्यास साधारण एका एकरात १५ ते २० टन हिरवी मका निघते़ मात्र विद्यापीठात एकरी चार टन मका निघत असून, यापासून शेतकऱ्यांनी नेमक काय आदर्श घ्यायचा, असा प्रश्न आहे़
03चांगल्या प्रतीचे बियाणे असल्यास साधारण एकरी २० टन मका निघते़ तसे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात येत असून, शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे़
विद्यापीठातील चाऱ्याची विरळ आणि कमी वाढ झाली आहे़ त्यामुळे तो परवडत नाही़ एकरी तीन ते चार टन इतकाच चारा निघत असून, कापणीवर मोठा खर्च होत आहे़ विद्यापीठातच चाऱ्याची अशी अवस्था असल्याने छावणी चालकांनी चारा आणायचा कुठून, असा प्रश्न आहे़
- पप्पू कर्डिले, छावणी चालक
राहुरी विद्यापीठात एकूण ३०० एकरवर मका, ज्वारीचे पीक चाऱ्यासाठी घेण्यात आले. त्यातून ३७०० मे. टन चारा उपलब्ध होणार आहे. एकरी १० ते १२ टन चारा उत्पादन होईल, असे अपेक्षित आहे.
- भरत राठोड, प्रकल्प प्रमुख