पुरावे नष्ट करण्याचे ‘रॅडिको’चे प्रयत्न
By Admin | Updated: June 24, 2015 01:48 IST2015-06-24T01:48:44+5:302015-06-24T01:48:44+5:30
सुखना धरणात लाल रंगाचे रसायनयुक्त पाणी सोडून जीवघेणा खेळ करणाऱ्या रॅडिको डिस्टिलरीज्ने आता पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

पुरावे नष्ट करण्याचे ‘रॅडिको’चे प्रयत्न
विनोद काकडे/संजय देशपांडे,औरंगाबाद
सुखना धरणात लाल रंगाचे रसायनयुक्त पाणी सोडून जीवघेणा खेळ करणाऱ्या रॅडिको डिस्टिलरीज्ने आता पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. वोखार्डच्या पाठीमागील तलाव तसेच नाल्यात ब्लिचिंग पावडरने भरलेल्या गोण्या रित्या करण्यात आल्या. स्पेंटवॉश हे घातक रसायन जमिनीवर टाकल्यानंतर टाकळी वैद्य शिवारातील योगेश वैष्णव यांची जमीनही अज्ञात व्यक्तींनी रातोरात नांगरून रसायनाच्या खुणा मिटविण्याचा प्रयत्न केला.
२०पेक्षा जास्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सुखना धरणात लाल रंगाचे विषारी पाणी कालविण्याचा तसेच शेतजमिनी, भूखंड व नाल्यांत ‘स्पेंटवॉश’ हे काळ्या रंगाचे घातक रसायन टाकण्याचा रॅडिको डिस्टिलरीज्चा उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. ‘लोकमत’ने २२ व २३ जूनच्या अंकात याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्ताने खळबळ उडाली.
राज्याचे पर्यावरणमंत्री आणि पालकमंत्री रामदास कदम यांनी या प्रकाराची सखोल चौकशी करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळास दिले आहेत. या पार्श्वभूमीवर संभाव्य कारवाई टाळण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न कंपनीने चालविले आहेत.