‘राधे माँ’प्रकरणी पोलीस सावध
By Admin | Updated: August 12, 2015 02:22 IST2015-08-12T02:22:29+5:302015-08-12T02:22:29+5:30
वादग्रस्त आध्यात्मिक गुरू राधे माँ यांच्या विविध प्रकरणांची हाताळणी मुंबई पोलीस काळजीपूर्वक करीत आहेत. सध्या राधे माँची चौकशी होत आहे. हुंड्याच्या प्रकरणाबाबत ‘राधे माँ’चे म्हणणे नोंदवून

‘राधे माँ’प्रकरणी पोलीस सावध
- डिप्पी वांकाणी, मुंबई
वादग्रस्त आध्यात्मिक गुरू राधे माँ यांच्या विविध प्रकरणांची हाताळणी मुंबई पोलीस काळजीपूर्वक करीत आहेत. सध्या राधे माँची चौकशी होत आहे. हुंड्याच्या प्रकरणाबाबत ‘राधे माँ’चे म्हणणे नोंदवून घेत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
‘राधे माँ’वरील अश्लीलतेच्या आरोपांबाबत आम्ही चौकशी करीत नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. कारण तसे करणे म्हणजे पोलीस नैतिक पहारेकऱ्याची (मॉरल पोलिसिंग) भूमिका बजावत असल्याकडे लक्ष वेधले जाईल.
मिनी स्कर्टमधील ‘राधे माँ’ची छायाचित्रे सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाली. त्यानंतर मुंबईतील वकील फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांनी राधे माँ हिने तिच्या भक्तांना भेटताना अश्लील वर्तन केल्याची तक्रार दिली.
आम्ही तिला समन्स पाठविले असून, तिच्याकडे आम्ही हुंड्यासंदर्भातील प्रकरणाबद्दल प्रश्न विचारणार आहोत; परंतु अश्लीलतेच्या मुद्द्यावर नाही. सध्या तरी आमच्याकडे अशी कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. कारण अश्लीलता म्हणजे काय हे आधी निश्चित करावे लागेल. नैतिकतेचे पहारेकरी म्हणून आमच्यावर आधीच नागरिकांचा रोष आहे. त्यामुळे आणखी एक वाद आम्हाला निर्माण करायचा नाही, असे हा आयपीएस अधिकारी म्हणाला. कोणाला एखादी गोष्ट अश्लील वाटली म्हणजे ती इतरांनाही तशी वाटावी असे नाही. चित्रपटांतील अभिनेत्री तर कितीतरी तोकड्या कपड्यांत असतात. आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा का, असाही प्रश्न या पोलीस अधिकाऱ्याने उपस्थित केला.
या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, चौकशी ही अतिशय प्राथमिक टप्प्यावर असल्यामुळे ‘राधे माँ’ला कधी अटक होईल, हे निश्चित नाही. आधी आम्ही त्या प्रकरणातील पीडित आणि आरोपी कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे नोंंदवून घेत आहोत.
- ‘राधे माँ’ला शुक्रवारी बोलावले आहे. मात्र शुक्रवारीच आपले म्हणणे नोंदवणे राधे माँ हिच्यावर बंधनकारक नाही. न्यायालयाकडून ती आणखी जास्त वेळ मागून घेऊ शकते, असेही हा अधिकारी म्हणाला.